Maharashtra Politics Crisis : शिवसेनेतील फूट आणि राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. कारण या प्रकरणाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – “महाराष्ट्र सर्वात असुरक्षित राज्य”, संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्त्र; म्हणाले, “हा मुडद्यात फुंकलेला प्राण…”

काय म्हणाले संजय राऊत?

“आमचं घटनेवर प्रेम आहे. १४ फेब्रुवारीपासून घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहे. ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज मुख्य न्यायधीशांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्राच्या प्रकरणावर आम्ही १४ फेब्रुवारीपासून सुनावणी घेऊ. १४ फेब्रुवारीचा दिवस व्हॅलेंटाईन दिवस आहे. सर्व काही प्रेमाने होईल”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होईल का? उज्वल निकम म्हणतात, “ठाकरे गटाची मागणी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावेळी खासदार अनिल देसाई देखील उपस्थित होते. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “ही सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार की नाही, याबाबत निश्चित सांगता येणार आहे. मात्र, १४ फेब्रुवारीपासून याबाबत सलग सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनाफीठापुढे होते की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे होते हे बघावं लागेल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.