scorecardresearch

“आपल्या चोर कंपनीला…”, घाबरू नका म्हणत संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay-Raut-fadnavis-1200
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हजारोंच्या संख्येत लोक मोर्चात सहभागी झालेले दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या ‘महामोर्चा’तील असल्याचा दावा राऊतांनी ट्विटमध्ये केला आहे. या ट्वीटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’तील नसून मराठा क्रांती मोर्चातील असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर प्रश्न उपस्थित केला आहे. राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो. याबाबत मला माहिती नाही, पण मी नक्की याची पडताळणी करेन, असं विधान फडणवीसांनी केलं आहे. ते हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “संजय राऊतांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा”, भाजपा नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

फडणवीसांच्या या विधानानंतर राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “मराठा मोर्चा हा सुद्धा महाराष्ट्राची ताकद होती. महाविकास आघाडीच्या मोर्चातही ही ताकद सहभागी झाली होती. त्यामुळे तुम्ही चौकशी करा. आपल्या चोर कंपनीला ‘क्लीन चीट’ देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे, हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झालाय! डरो मत!” असं राऊत ट्वीटमध्ये म्हणाले.

हेही वाचा- राऊतांकडून झाली मोठी चूक? महामोर्चा म्हणून भलताच VIDEO केला ट्वीट? फडणवीसांकडून प्रश्न उपस्थित

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फडणवीस म्हणाले, “संजय राऊतांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. मी काल महाविकास आघाडीच्या मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ म्हटलं होतं, कारण तो मोर्चा ‘नॅनो’च होता. सात संघटना एकत्र करूनही त्यांना २०-२२ हजार लोक जमा करता आले नाही, असा तो मोर्चा होता. पण संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. याची मी नक्की पडताळणी करेन. हा व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो. कारण ‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-12-2022 at 22:54 IST