कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय संपादन केला आहे. या विजयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत शिवसेनेमुळे कसबा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. पण आता भाजपाचा प्रत्येक बालेकिल्ला अशाच पद्धतीने उद्ध्वस्त करू, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाबद्दल विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “ही परिवर्तनाची नांदी आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे. कसब्यात आतापर्यंत शिवसेनेच्या पाठिंब्याने भाजपा जिंकत आली आहे. आज महाराष्ट्राला, दिल्लीला आणि फडणवीसांना कळालं असेल की खरी शिवसेना कुठे आहे. चिंचवडची जागाही आम्ही पहिल्या फेरीपासून जिंकू शकत होतो. तिथे अजून संघर्ष सुरू आहे. पण तिथे भाजपा आणि मिंधे गटाने तिसरा उमेदवार उभा करून मतांची विभागणी केली. पुढच्या वेळी आम्ही चिंचवडही जिंकू… महाराष्ट्रही जिंकू… ही सुरुवात आहे.”

हेही वाचा- संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भारतीय जनता पार्टीने कसबा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तरीही त्यांना हार पत्करावी लागली, याबाबत विचारलं असता संजय राऊत पुढे म्हणाले की, कसबा हा त्यांचा बालेकिल्ला आहे, असं त्यांना आतापर्यंत वाटत होतं. येथील विशिष्ट वर्गाच्या मतांवर आपलं एकतर्फी वर्चस्व आहे, असं त्यांना वाटत होतं. मात्र त्या पेठांमधील सगळी मतं मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीला मिळाली आहेत. हे लक्षात घ्या. मी परत सांगतो, भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेना उभी होती, त्यामुळे आतापर्यंत त्यांचे बालेकिल्ले भक्कम राहिले होते. आता त्यांचा प्रत्येक बालेकिल्ला याच पद्धतीने उद्ध्वस्त करू, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction on kasba bypoll election result give challenge to devendra fadnavis rmm
First published on: 02-03-2023 at 16:18 IST