शिवसेनेनं मंडल कमिशन आयोगाला विरोध केला. त्यांच्यामुळेच मराठा आरक्षण गेलं, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा आहे. जात-पात-धर्म न पाहता आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं, असं बाळासाहेब ठाकरे सांगायचे. ही बाळासाहेबांची भूमिका देवेंद्र फडणवीसांना कधीच कळणार नाही, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा आहे. त्यांना सामाजिक जडणघडणीचं पूर्ण भान नाही. छत्री उगवावी तसं त्यांचं मुख्यमंत्रीपद उगवलं होतं. नरेंद्र मोदींच्या कृपेने ते मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेंही मोदी आणि शाहांच्या कृपेने मुख्यमंत्री झाले. शिवसेना फोडण्यासाठी त्यांना साधन हवं होतं. सत्ता आणि तपास यंत्रणांच्या मदतीनं शिंदे मुख्यमंत्री झाले.”

“…म्हणून फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली”

“अनुभव आणि कर्तबगारीमुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत. ही मोदी आणि शाहांच्या भाजपाची परंपरा आहे. मुख्यमंत्रीपदावर गोपीनाथ मुंडे यांचा हक्क होता. दुर्दैवानं ते आपल्यात राहिले नाहीत. म्हणून फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. दुसऱ्या क्रमाकांवर एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्रीपदावर हक्क होता. फडणवीसांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात खडसेंचा वाटा असल्याचं सांगितलं जातं.”

हेही वाचा : “दादांना माहीतच नव्हतं, तर ते काय सांगतील”, अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया

“…तर तुमचं कुणीही ऐकणार नाही”

“फडणवीस शिवसेनेबाबत भूमिका मांडत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना आणि महाराष्ट्राला कुणाकडून राजकारण शिकण्याची गरज नाही. सत्ता आणि यंत्रणा असल्यामुळं आपल्याकडं ज्ञान आहे. तपास यंत्रणा तुमच्याकडं नसल्यावर कुणीही तुमचं ऐकणार नाही. आज तुम्ही मांडलेला उच्छाद उद्या तुमच्याविरोधात सुरू होईल,” असा इशारा राऊतांनी फडणवीसांना दिला.

हेही वाचा : गुणरत्न सदावर्ते कोणाचा माणूस आहे? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले, “ते स्वतः…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…अन् बाळासाहेबांच्या या भूमिकेतून शिवसेना उभी राहिली”

“महाराष्ट्र जाती, पाती आणि धर्मात तुटू नये, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. मराठा-मराठेतर, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, ९६ कुळी- ९२ कुळी, घाटी-कोकणी, स्पृश्य-अस्पृश्य या सर्व भेदांना गाडून मराठी माणसांना एकत्र आणणं, या बाळासाहेबांच्या भूमिकेतून शिवसेना उभी राहिली. जात-पात-धर्म न पाहता आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं, असं बाळासाहेब सांगायचे. ही बाळासाहेबांची भूमिका देवेंद्र फडणवीसांना कधीच कळणार नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.