धारावीतील सर्व रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, धारावीतील ‘टीडीआर’साठी सरकारने स्वतंत्र कंपनी स्थापन करावी आणि अन्य मागण्यांसाठी ठाकरे गटानं वांद्रे येथील अदाणी कार्यालयावर शनिवारी ( १६ नोव्हेंबर ) मोर्चा काढला होता. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चा शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर, मोर्चात महाराष्ट्रातून लोक बोलावली होती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली होती. याला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “धारावीच्या मोर्च्याची मुख्यमंत्री चेष्टा करत आहेत. तुम्ही कुणाची दलाली करत आहात? मोर्च्यातील सगळी लोक चंद्रावरून आली होती. पण, प्रश्न मुंबई आणि धारावीचा होता ना? लोक चंद्रावरून किंवा मंगळावरून येऊद्या. मुख्यमंत्र्यांना काही कळतं का?”
“मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या पायाशी मराठीपण गुंडाळून ठेवलं”
“मुंबई भांडवलदारांपासून वाचवण्यासाठी १०६ लोकांना हुतात्म पत्कारलं आहे. पुन्हा हुतात्म पत्करू. एका भांडवलदाराच्या घशात मुंबई जात आहे. हुंडा म्हणून मुंबई दिली आहे का? ही मुंबई मराठी माणसांची आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या पायाशी मराठीपण गुंडाळून ठेवलं असेल, तसं त्यांनी सांगावं. शनिवारी इशारा मोर्चा निघाला होता,” असं संजय राऊतांनी म्हटलं.
हेही वाचा : “ठाकरे डिमांड रूपया मिळाला की….”, अदाणी समूहाविरोधात काढलेल्या मोर्चावरून भाजपा नेत्याचा टोला
“शिवसेनेनं कधीही विकासाच्या विरोधात भूमिका घेतली नाही”
‘विकास विरोधी मोर्चा,’ असंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं होतं. याबद्दल विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेनं कधीही विकासाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. शिवसेनेच्या काळात मुंबईत औद्योगिक विकास झाला. आम्ही कधीही मुंबईत संप केला नाही, कारण विकासाची गती थांबते.”