‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे. या बेटिंग अॅपवरून छत्तीसगडमधील राजकारण तापलं आहे. ‘महादेव’ बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (३ नोव्हेंबर) केला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, बघेल यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. यावर आता महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील सोमवारी (६ ऑक्टोबर) या प्रकरणावर भाष्य केलं.
भूपेश बघेल हे भाजपात गेले तर ‘महादेव’ बेटिंग अॅपचे ‘हर हर महादेव’ अॅप होईल. इतक्या निर्लज्जपणाने देशातली व्यवस्था चालत आहे आणि अशावेळी आपण गप्प कसं काय बसू शकतो? असा संतप्त प्रश्न उद्धव टाकरे यांनी उपस्थित केला. यावर आता ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांवर टीका केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, लालू् प्रसाद यादव एकदा म्हणाले होते की मी भाजपात गेलो असतो तर एव्हाना मी राजा हरिश्चंद्राचा अवतार झालो असतो, सत्यवादी झालो असतो. परंतु, मी भाजपात गेलो नाही, मी त्यांच्यासमोर गुडघे टेकले नाहीत, म्हणून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कारवाई चालू आहे. महादेव अॅपचंही तसंच आहे.
शिवसेना नेते म्हणाले, भूपेश बघेल भाजपात गेले किंवा त्यांनी भाजपाला मदत केली तर भाजपात त्यांना देवाचं स्थान मिळेल. हे लोक ‘महादेव अॅप’चं ‘हर हर महादेव अॅप’ करतील. भूपेश बघेल यांच्यावर अभिषेक केला जाईल. हे अगदीच खरं आहे. तुम्ही हवं तर महाराष्ट्रात पाहा. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हेसुद्धा महादेव अॅपचे सदस्य आहेत. आता त्यांची पूजा केली जात आहे. तुम्ही (भाजपा) यांना तुरुंगात डांबणार होता. परंतु, आता यांची पूजा करत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पवार-भुजबळ-मुश्रीफांवर फुलं उधळत आहेत.
हे ही वाचा >> “मीच ‘महादेव’ बेटिंग अॅपचा मालक, भूपेश बघेल यांच्या सांगण्यावरून…”, फरार आरोपीचा दुबईतून खळबळजनक दावा
खासदार राऊत म्हणाले, नुकतंच तुम्ही गोंदियात पाहिलं असेल. प्रफुल्ल पटेल यांनी तिथे नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. हे तेच प्रफुल्ल पटेल आहेत, ज्यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी आरोप केले होते. इक्बाल मिर्ची आणि पटेल यांचे संबध जोडले होते. हेच प्रफुल्ल पटेल नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उभे होते. मोदी आणि पटेल हे दोघे हातात हात घालून चालत होते. ही सगळी महादेव अॅपची कमाल आहे