उद्धव ठाकरेंनी माझा उल्लेख फडतूस असा केला, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मी फडतूस नाही तर काडतूस आहे, असं वक्तव्य करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा काल समाचार घेतला होता. दरम्यान, फडणवीसांना आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले की, तुमचं खरं काडतूस हे ईडी (सक्तवसुली संचालनालय) आणि सीबीआय (केंद्रीय अन्वेषण ब्युरो) आहे.

संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या टोळीतील, डॉ. मिंधे यांच्या टोळीतील गुंडांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केली. या टोळीने अत्यंत निर्घृण आणि अमानुषपणे हा हल्ला केला, त्यात रोशनी शिंदे जखमी झाल्या. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु हा सर्व प्रकार होत असताना पोलीस बघत होते. म्हणून उद्धव ठाकरे गृहमंत्र्यांना फडतूस म्हणाले.

हे ही वाचा >> बारामतीत सुप्रिया सुळेंना टक्कर, तृप्ती देसाई लोकसभा निवडणूक लढणार, म्हणाल्या, “भाजपाने…”

संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक म्हटलं आहे. पण उद्धव ठाकरे केवळ फडतूस म्हणाले. फडतूसचा अर्थ बेकार, अर्थहीन, युजलेस आणि बिनकामाचे असा होतो. ते स्वतःला काडतूस म्हणाले, पण अशी काडतुसं उडत नाहीत. तुमचं खरं काडतूस हे सीबीआय आणि ईडी आहे. म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली आहे. तुम्ही ईडी आणि सीबीआयला बाजूला ठेवून या. मग आम्ही तुम्हाला दाखवतो काडतूस कुठे घुसतं.