Sanjay Raut राज्यातील काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये १५ ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी मांस, मच्छीची दुकाने बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी महायुती सरकारला धारेवर धरले. देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं थोतांड बंद करा असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा मर्द मराठ्यांचा महाराष्ट्र आहे. या राज्याला शाकाहारी राज्य घोषित केलं आहे का? कुणाच्या दबावाखाली हे चाललं आहे? मुंबई, पुण्यात अनेक सोसायट्यांमध्ये डोंबिवलीतही अनेक सोसायट्यांमध्ये मांस-मच्छी खाणाऱ्यांना घर विकलं जात नाही. यावर संघर्ष सुरुच आहे. आता १५ ऑगस्टला मांस विक्रीवर महापालिका नोटीस काढते आणि मांसविक्रीवर बंदी घालते. याला काय अर्थ आहे? हा शौर्याचा दिवस आहे, स्वातंत्र्य मिळालं आहे आणि ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा फडणवीसांमुळे मिळालेलं नाही. मांस-मच्छी न खाणाऱ्यांची विचारसरणी आहे ते स्वातंत्र्य लढ्यात कुणीच नव्हतं. असं राऊत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे वरण-भात, तूप खाऊन युद्ध करत नव्हते
काँग्रेसच्या काळातलाच आदेश आहे असं फडणवीस म्हणतात. ते सोडून द्या तुम्ही काय करताय ते सांगा. काँग्रेस आणि नेहरुंचं नाव घेतात. तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवायचं ठरवलं आहे का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काही वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते. बाजीराव पेशवेही मांसाहारच करत होते, त्याशिवाय युद्धात लढता येत नाही. आता सीमेवरच्या सैन्याला मांसाहार करावाच लागतो. सीमेवरच्या जवानांनाही मांसाहार करावाच लागतो. वरण, भात, तूप, श्रीखंड-पुरी खाऊन युद्ध लढता येत नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला नामर्द आणि नपुंसक करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी हा फतवा मागे घ्या. जे लपून खात आहेत त्यांनी ही बंदी मागे घेतली पाहिजे. हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं बोलू नका. हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
रेडे कापून सत्तेवर आलेलं सरकार मांस विक्रीला विरोध का करतंय?
शरद पवार मुख्यमंत्री होते त्या गोष्टीला आता किती काळ लोटला? तुम्ही कोणते अध्यादेश बाहेर काढत आहात? शरद पवारांच्या काळात अध्यादेश निघाला की नाही मला माहीत नाही. कारण शरद पवार असं करत असतील तर मला आश्चर्य वाटेल. १५ ऑगस्ट हा विजय उत्सव आहे तो धार्मिक सण नाही. तुम्ही पुरणपोळ्या, श्रीखंड पुरीच्या पार्ट्या द्या. जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं तिथल्या काही लोकांनी रेड्याचं मांस प्रसाद म्हणून खाल्ला आहे. रेडे कापून, बकरे, कोंबड्या, बदकं कापून जे सरकार आलं त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा वाटतो? कामाख्या मंदिरात बदकं कापली जातात, इतर प्राणी कापले जातात. अशा सरकारचे जनक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगत आहेत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्य दिनी, मला वाटतं त्यांनी हे थोतांड बंद करावं असंही राऊत म्हणाले.