२०१४ पूर्वी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार होतं आणि महाराष्ट्रातील नेते कृषीमंत्री होते. तेव्हा शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं जात होतं. पण ते त्यांच्यापर्यंत पोहचतच नव्हतं, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचं नाव न घेता केलं. यवतमाळ येथे बुधवारी आयोजित महिला मेळाव्यात मोदी बोलत होते. मोदी यांच्या शरद पवारांवरील टीकेला आता पवारांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी हे खोटं बोलत आहेत. पंतप्रधानपदासारख्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने खोटं बोलू नये.

संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी स्वतःच त्यांची शरद पवारांबाबतची आधीची वक्तव्ये आठवून पाहावी. नरेंद्र मोदी म्हणाले होते शरद पवार हे या देशातले उत्तम कृषीमंत्री होते. देशात यूपीएचं सरकार होतं तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा केंद्र सरकारने मोदींबाबत वेगळी भूमिका घेतली होती. केंद्राने मोदींबरोबर असहकार्याची भूमिका घेतली होती तेव्हा कृषीमंत्री शरद पवार हेच नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या कृषी आणि सहकार विभागात आवर्जून मदत करत होते. शरद पवारांनी मोदींची राजकारणापलिकडे जाऊन मदत केली आहे. ही गोष्ट मोदी यांनी स्वतः वारंवार सांगितली आहे. मोदींना एखाद्या गावात जाऊन निवडणुकीआधी खोटं बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. परंतु, मोदींनी यापूर्वी सांगितलं होतं की ते शरद पवारांचा हात धरून राजकारणात आले आहेत. शरद पवार हे त्यांचे राजकीय गुरू आहेत. तेच मोदी आता पवारांबद्दल वाट्टेल ते बोलत आहेत.

खासदार राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की, महाराष्ट्रात आणि या देशातला सर्वात मोठा घोटाळा कुठला असेल तर तो आदर्श घोटाळा आहे. त्याच घोटाळ्याच्या सूत्रधाराला त्यांनी आपल्या पक्षात घेऊन राज्यसभा दिली आहे. मोदी यांनी असंही सांगितलं होतं की, महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला आहे. इतका मोठा भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. परंतु, त्याच सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवारांना त्यांनी आपल्या युतीत घेऊन उपमुख्यमंत्री केलं आहे. त्यामुळे पंतप्रधानांवर आणि त्यांच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवावा अशी मानसिकता जनतेत राहिलेली नाही.

हे ही वाचा >> महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये काय म्हणाले होते?

मोदी म्हणाले, जेव्हा दिल्लीत यूपीएचं सरकार होतं, तेव्हा देशाची काय अवस्था होती? तेव्हा तर महाराष्ट्रातले कृषिमंत्री (शरद पवार) होते. तेव्हा दिल्लीतून शेतकरी पॅकेज जाहीर व्हायचं मात्र शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते. केंद्र सरकारने एक रुपया पाठवला तर गावात फक्त १५ पैसे पोहचत होते. परंतु, आज मी एक बटण दाबलं आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी रुपये जमा झाले. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. आता काँग्रेस शासन असतं, तर २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी मध्येच काही लोकांनी खाऊन टाकले असते.