कॅगच्या अहवालात मोदी सरकारच्या सात योजनांमधील भ्रष्टाचारावरून ताशेरे ओढण्यात आले आहेत. यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅगच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

कॅगच्या अहवालाद्वारे नितीन गडकरींना अडकवण्याचा कट रचला जातोय, या विरोधी पक्षाच्या आरोपाबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “माझ्याकडे त्याबाबत माहिती नाही. पण नितीन गडकरी हे देशातील महत्त्वाचे नेते आहेत. ते कार्यक्षम मंत्री आहेत. देशभरात त्यांनी केलेलं कामच सध्या दिसतंय. ते भविष्यामधील या देशाचे नेतृत्व आहेत. जे वाटेत आडवे जातात, त्यांना कसं संपवायचं? यासाठी अनेक यंत्रणा राबवल्या जातात, हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही त्याचे पीडित आहोत.” मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी हे विधान केलं.

हेही वाचा- “…तर राम मंदिराच्या उद्घाटनावेळी धर्मांधतेचा आगडोंब उसळेल”, संजय राऊतांचा दावा; म्हणाले, “ट्रेनवर दगडफेक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय वडेट्टीवार यांनी नेमका काय आरोप केला होता?

“कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे. नितीन गडकरींविषयी सगळे सांगतात की, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला करून त्यांचं राजकारण संपवायचं हेही एक कारण असू शकतं,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.