scorecardresearch

“ढूंढते रह जाओगे”, संजय राऊतांचा केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींवरून भाजपावर खोचक टोला!

पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तीकर विभागानं छापा टाकल्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे.

Sanjay raut
(संग्रहीत छायाचित्र)

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. नुकतीच ईडीकडून नवाब मलिक यांना झालेली अटक आणि त्यानंतर मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं टाकलेला छापा या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपावर टीका करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात आज सकाळी माध्यमांशी बोलताना शिवसेना खासादार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर खोचक टीका केली आहे.

“इन्कम आणि टॅक्स फक्त महाराष्ट्रातच?”

यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभाानं टाकलेल्या छाप्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. “केंद्र सरकारला वाटतंय की इन्कम फक्त महाराष्ट्रातच आहे. सर्वाधिक टॅक्स मुंबई आणि महाराष्ट्रच देतो. महाराष्ट्राच्या लोकांना अशा प्रकारे त्रास देणं, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छळ करणं याची नोंद महाराष्ट्रातली जनता घेतेय. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशा प्रकारे बदनामीची मोहीम सुरू आहे. फार काळ हे चालणार नाही. आमचं लक्ष आहे. आम्ही हा त्रास सहन करायला तयार आहोत. पण महाराष्ट्र वाकणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“केंद्रीय तपास यंत्रणांना फक्त…”

“मला वाटतं फक्त महाराष्ट्रातच इन्कम आहे आणि टॅक्स आहे. बाकी भाजपाशासित राज्यांत इन्कमही नाही आणि टॅक्सही नाही. केंद्रीय तपास यंत्रणांना फक्त महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच काम आहे. बाकी आख्खा देश रिकामाच आहे. सगळं काही ठीक ठाक आहे. घेऊ द्या शोध… ढूंढते रह जाओगे”, असं देखील संजय राऊत म्हणाले.

मराठीबाबत भाजपा दुटप्पी…

“मराठी माणसाला बदनाम करायचं, आर्थिक कोंडी करायची आणि दुसरीकडे मराठी कट्ट्यांसारखे कार्यक्रम करून ढोंग करायचं. मराठी पाट्यांना विरोध करणारे लोक भाजपाचेच आहेत हे लक्षात घ्या”, असं राऊत म्हणाले.

“जेवढा हे केंद्रातून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील..”, आदित्य ठाकरेंनी भाजपावर साधला निशाणा!

“मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचं श्रेय ठाकरे सरकारला मिळू नये, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. श्रेय कुणीही घ्या, पण मराठीचा मान राखा. छत्रपतींच्या भाषेला यासाठी भीक मागावी लागत असेल, तर त्यासारखं दुसरं दुर्दैवं नाही. किमान भाषेच्या बाबतीत तरी मराठीवरची जळमटं दूर करा”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut targets bjp on income tax raid on yashwant jadhav ed arrest nawab malik pmw

ताज्या बातम्या