गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीची जोरदार चर्चा चालू आहे. संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मयूर शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. मयूर शिंदे शिवसेनेचाच कार्यकर्ता असल्याची माहिती सध्या व्हायरल होत आहे. यावरून भाजपा आणि मनसेनं ठाकरे गटावर व विशेषत: संजय राऊतांवर टीकास्र सोडलं आहे. या प्रकरणावरून राजकारण तापलेलं असतानाच संजय राऊतांनी गुरुवारी मध्यरात्री या प्रकरणावर एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एका वृत्तवाहिनीची एक बातमीही शेअर केली आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांच्या एका फोन संभाषणाची ही ऑडिओ क्लिप होती. यामध्ये समोरची व्यक्ती या दोघांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं ऐकू येत आहे. संजय राऊतांना रोज सकाळच्या पत्रकार परिषदा बंद करण्याची धमकी दिली जात आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शरद पवार यांनाही याचवेळी ट्विटरवरून अशी धमकी आल्यामुळे यावरून राजकारण तापलं.

एकीकडे विरोधकांनी धमकी प्रकरणावरून सरकारला घेरायला सुरुवात केली असताना दुसरीकडे मयूर शिंदे शिवसेनेचाच कार्यकर्ता असल्याचा दावा सत्ताधारी भाजपा आणि मनसेच्या काही नेत्यांनी सुरू केला. यासाठी मयूर शिंदेचे सुनील राऊत यांच्यासमवेत काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे संजय राऊतांनी स्वत:च स्वत:ला धमकी देण्याचं नाटक रचल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांनी केला. यावर संजय राऊतांनी गुरुवारी मध्यरात्री ट्वीट केलं आहे.

मयूर शिंदे शिवसेनेचा नव्हे, भाजपाचा कार्यकर्ता?

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी एबीपी माझाच्या एका वृत्ताचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मयूर शिंदेनं तिकीट न मिळाल्यामुळे शिवसेनेतून भाजपात प्रवेश केल्याचं वृत्त दाखवण्यात आलं आहे. शिवाय, मयूर शिंदेच्या भाजपा प्रवेशाचे फोटोही दाखवण्यात आले. संजय राऊतांनी या व्हिडीओसह केलेल्या ट्वीटमध्ये सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.

ठाणे : मयुर शिंदे याच्या अटकेनंतर ठाण्यातील राजकारण तापले

“जाहिरात कांडावरून लक्ष उडवण्यासाठी रचलेला हा बनाव. स्पष्टच दिसतंय. ठाणे परिसरातले सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकतर भाजपात आहेत, नाहीतर सध्याच्या शिंदे गटात. हे लोक आमच्यासाठी असं काही करतील, यावर कुणी मूर्खही विश्वास ठेवणार नाही. हे बनावट प्रकरण त्यातलंच आहे”, असं संजय राऊतांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या ट्वीटनंतर आता मयूर सिंदे नेमका कोणत्या पक्षाचा? या प्रश्नावर राजकारण रंगण्याची शक्यता आहे.