संजय राऊत हा फुसका फटका आहे. आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंनाही प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, ते मुख्यमंत्री असताना ५० वेळा तरी काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद का सोडले नाही? काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद उपभोगले.
भारत जोडो यात्रेतही वीर सावरकर यांचा अपमान
भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरे यांच्यात जर का धमक असेल तर त्यांनी काँग्रेसपासून दूर होतो हे जाहीर करावं. हिंमत असेल तर उद्या जाहीर करा. नुसतं तोंडाच्या वाफा काढू नका असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.
निवडणुकीची भाषा कोण करतंय?
उद्धव ठाकरे कधी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढले नाही. मागच्या दारातून विधानपरिषेदवर गेलेले उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याची गोष्ट करतात? ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही , त्यांनी निवडणुकीच्या गप्पा मारू नये. जेव्हा केव्हा निवडणूक होईल आम्ही विधानसभेतील २०० जागा जिंकून येऊ असाही विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरेंनी त्यांचं कुळ बुडवलं
उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. मी त्यांना सांगू इच्छितो आमचं बावनकुळे हे कुळ हिंदुत्ववादी आहे. तुम्ही तुमचा कुळ बुडवलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या ज्या कुळाला उंची दिली होती ते कुळ तुम्ही बुडवलं आहे. उद्धव ठाकरे तुम्ही ठाकरे कुटुंबाचं नाव बुडवत आहात. एकदा तरी ठाकरी बाणा दाखवा आणि काँग्रेस पक्षाची साथ सोडा. ते रोज सावरकरांचा अपमान करतात. नुसत्या सभेतूनच वल्गना करू नका असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी ठणकावलं आहे.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघंही नौटंकी करत आहेत. एकदा तुम्ही ठरवा आणि निर्णय घ्या. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी तुम्ही काँग्रेस पक्षाकडे गेले. जर तुम्ही काँग्रेस पक्षाची साथ सोडली, तर संपूर्ण महाराष्ट्र तुमचं अभिनंदन करेल. मी सुद्धा उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करेन असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.