संजय राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या बैठका झाल्या आहेत. बोलणीही सुरु आहेत. ही जी माहिती मला सूत्रांनी दिली आहे त्यांनी हे पण सांगितलं की जर तुम्ही संजय राऊत यांची शरद पवारांच्या राजीनाम्याच्या वेळीची भूमिका पाहिली किंवा त्याआधीची भूमिका पाहा ते अजित पवारांवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची अटच अशी आहे की अजित पवारांनी पक्ष सोडला तर मी पक्ष प्रवेश लगेच करतो असं संजय राऊत यांनी शरद पवारांना सांगितलं आहे. हा खळबळजनक दावा भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आहे. नितेश राणे यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनीही याबाबती प्रतिक्रिया दिली आहे.
“नितेश राणे नक्की भाजपाचे आमदार आहेत का? कारण शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी, भाजपा असे १० पक्ष फिरलेल्या माणसाने संजय राऊतांच्या निष्ठेच्याबाबतीत दावा करू नये. संजय राऊत बाळासाहेबांचे भक्त आहेत. उद्धव ठाकरेंवरील निष्ठा असलेले शिवसैनिक आहेत”, असं सुनिल राऊत म्हणाले. टीव्ही नाईन मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हेही वाचा >> “१० जूनपर्यंत संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार” भाजपा आमदार नितेश राणेंचा दावा
“१०४ दिवस तुरुंगात काढले, पण भाजपासमोर गुडघे टेकले नाहीत. नेपाळी नितेश राणेने शिवसेनेच्या संजय राऊतांना बोलू नये. संजय राऊत शिवसेनेचा भक्त आहे. जो जन्मलाही शिवसेनेत आणि शेवटचं आयुष्यही शिवसेनेत जाईल. नितेश राणेंना विशेष घेण्याची गरज नाही. आमचा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध नाही. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर असलेले प्रेम, श्रद्धा हा वेगळा विषय आहे”, असंही सुनिला राऊत पुढे म्हणाले.
नितेश राणे काय म्हणाले होते?
“आम्ही सातत्याने उद्धव ठाकरेंना सांगत होतो की संजय राऊत साप आहे. हा ना बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला ना तुमचा होणार. बाळासाहेब ठाकरे असताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये भांडणं लावली. उद्या जेव्हा संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करतील तेव्हा त्यांचे मनसुबे उद्धव ठाकरेंना कळतील. या एका माणसामुळे तुम्ही किती लोकांना तोडलंत”, असं नितेश राणे म्हणाले.