मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात सभा झाली. या सभेची राजकीय वर्तुळात सभा होण्या अगोदर आणि सभा झाल्यानंतरही चर्चा दिसत आहे. कारण, या सभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या नेतेमंडळींनी भाषणांमधून जोरदार टोलेबाजी केली. याशिवाय, या सभेतून शिंदे गट आणि भाजपा शक्तीप्रदर्शन करणार असल्याचंही बोललं गेलं होतं. मात्र अपेक्षेप्रमाणे या सभेस गर्दी झाली नसल्याचे दिसून आले. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विशेषकरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदेवर टीका सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “अनेक समस्या आहेत, परंतु तरीही अत्यंत हीन दर्जाच्या राजकारणात जर मुख्यमंत्री पडणार असतील आणि त्यासाठी सत्ता वापरणार असतील. तर जनता सर्वकाही पाहात असते आणि मग जनता अशा मुख्यमंत्र्यांकडे पाठ फिरवते. हे काल वरळीत आपण पाहीलं.”




हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या सभेत दगडफेकीच्या घटनेवरून अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप, म्हणाले…
याचबरोबर “कोणी काही म्हणू द्या, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या आव्हानाच्या आवेशात ते आणि त्यांचा मिंधे गट काल वरळीतील कोळीवाड्यात गेला. एक विराट सभा घेण्याचा प्रयत्न केला, शेवटी खुर्च्या उचलण्याची वेळ आली आणि थातूरमातूर उद्योग करून तो कार्यक्रम पूर्ण केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होऊ नये या मताचे आम्ही आहोत. त्या पदावर जरी आमचे विरोधक बसले असले कोणीही, गद्दार, बेईमान बसले असले कुठेही तरी शेवटी मुख्यमंत्री पदाची खुर्ची आहे. आपण मुख्यमंत्री म्हणून तिथे आला होता. की फक्त आव्हानांची भाषा करणारे, फुटीर गटाचे नेते म्हणून आला होता? याचा विचार आता या सगळ्यांनी केला पाहिजे.” असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – “…त्यामुळे ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत, नाहीतर…” मनसे आमदार प्रमोद पाटलांचा आदित्य ठाकरेंना इशारा!
याशिवाय, “या मुंबईतील कोळी समाज, कोळी बांधव, कोळी वाडे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून, शिवसेनेबरोबर ठामपणे उभे आहेत. आम्ही त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. कोळीवाड्यांच्या विकासासाठी काम केलेलं आहे. मुंबईतील सर्व जाती-पाती, प्रमुख धर्म, पंथ यांचा विचार न करता आम्ही काम केलेलं आहे. कोळीबांधव हे मुंबईतील मूळचे रहिवासी आहेत. त्यामुळे ते मूळ शिवसेनेबरोबरच आहेत. हे काल स्पष्ट झालं. मला कोणावर टीका करायची नाही, पण अशी बेअब्रू परत राज्याच्या मुख्यमंत्र्याची होऊ नये, याची काळजी त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने घेतली पाहिजे. ” असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.