Premium

“राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, आपण आता…”; राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर!

“उद्धव ठाकरेंवर टीका करून अन्य कोणावर टीका करून तुमचं राजकारण किती काळ चालणार?”, असंही म्हणाले आहेत.

sanjay raut and raj Thakrey
(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आज संजय राऊतांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “छत्रपती संभाजीराजे, उदयनराजेंनी जी भूमिका घेतली, ती भूमिका म्हणजे…”; संजय राऊतांचं विधान!

राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. आम्हाला जर मिमिक्री पाहायची असेल, काही मुद्रा अभिनय, नाट्य अभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू, आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा. अनेकजण आहेत आम्ही खरी मिमिक्री बघू. आवाज काढणं अजून काहीतरी करणं, हे आता खूप झालं. आपण आता mature झालेला आहात. थोडं पलिकडे पाहा, महाराष्ट्र पाहा पूर्ण.”

हेही वाचा – भाजपाच्या ‘आराध्य दैवतां’कडून शिवरायांचा अपमान; स्वाभिमानाच्या गोष्टी करून गेले ते किती वेळ हात चोळत बसणार? – संजय राऊत

“उद्धव ठाकरेंवर टीका करून अन्य कोणावर टीका करून तुमचं राजकारण किती काळ चालणार? कोणाचंही मी एका पक्षाचं नाव घेत नाही. राजकारणात काही विधायक काम करा. संघटनात्मक काम करा, जे आम्ही करतोय. आमच्या पक्षावर एवढी संकटं आहेत, तरी आमचा पक्ष उभा राहतोय, लढतोय काम करतोय. ज्यांनी आमच्यावर टीका केली, करत आहेत त्यांनी बुलढाणा येथे झालेला आमची सभा पाहायला हवी होती आणि त्या दिवशीचं उद्धव ठाकरेंचं भाषणही ऐकायला हवं होतं.”

काय म्हणाले होते राज ठाकरे? –

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपाशी युती तोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. स्वार्थ आणि पैशांसाठी आपण कधी विचारांशी प्रतारणा केली नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे.

याशिवाय, “काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले… मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी करत नाही.” असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 12:38 IST
Next Story
मुलाच्या विवाह सोहळ्यात दिसली जयंत पाटील यांची राजकीय शक्ती; प्रतीक पाटील यांच्यासाठी तयारी सुरू