मराठा आरक्षणाची मागणी करत जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. या लाठीहल्ल्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनावर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असणार, अशा दावा विरोधी पक्षातील नेते करत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (४ सप्टेंबर) मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. अशातच आता सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्याच्या वक्तव्यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी संजय शिरसाट म्हणाले, त्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला, या घटनेचा सर्वांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. मी सध्या अधिकृतपणे सांगू शकत नाही, परंतु माझी माहिती अशी आहे की या महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याने या मराठा आंदोलनाला चिथावणी दिली होती. तो नेता कोण आहे? याची सरकारने चौकशी करावी अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे.

आमदार संजय शिरसाट म्हणाले, एखादं आंदोलन चिघळवायचं आणि त्यातून आपण बाहेर पडून महाराष्ट्र पेटवायचा हे तंत्र काही लोकांचं आहे. त्यामुळे याबाबत चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे मी याप्रकरणी चौकशीची मागणी करणार आहे.

हे ही वाचा >> President of Bharat: राष्ट्रपती भवनाच्या पत्रावरील ‘त्या’ उल्लेखावरून वाद; ‘इंडिया’ नाव हटवलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली!

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात हे आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश येत नाही तोवर उपोषण सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावली आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक चिंतेत आहेत.