विश्वास पवार

भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाईमध्ये केले. त्यांच्या या कार्यामुळे ज्ञाननिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाईचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले, अशी माहिती मराठी विश्वकोशाचे सहायक संपादक रवींद्र घोडराज आणि सरोजकुमार मिठारी यांनी दिली.

प्रागतिक इतिहास संस्था व किसन वीर महाविद्यालय यांच्यावतीने मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्यविश्वावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र २७ जानेवारीपासून वाई येथे होत आहे. यानिमित्ताने तर्कतीर्थानी निर्माण केलेल्या विविध साहित्यांचे संकलन करताना घोडराज आणि मिठारी यांना भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर वाईमध्येच झाल्याची माहिती मिळाली आहे.

भारतीय राज्यघटनेचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्याचा प्रश्न जेव्हा पुढे आला, तेव्हा ती जबाबदारी तर्कतीर्थावर सोपविण्यात आली होती. घटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार त्यावेळी १४ भाषांना राज्यभाषा म्हणून मान्यता देण्यात आली होती. यामुळे घटनेचे संस्कृत भाषांतर करणे अनिवार्य होते. त्यासाठी तत्कालीन लोकसभा सभापतींनी संस्कृत भाषांतरासाठी समिती नियुक्ती केली. त्या समितीचे अध्यक्ष महामहोपाध्याय पां. वा. काणे होते. तर प्रमुख भाषांतरकार व समितीनिमंत्रक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची, तर सहभाषांतरकार म्हणून डॉ. मंगलदेवशास्त्री (बनारस) यांची नियुक्ती करण्यात आली. समितीतील अन्य सदस्यांमध्ये डॉ. सुनीतीकुमार चतर्जी (कलकत्ता), के. बालसुब्रह्मण्यम अय्यर (मद्रास), महामहोपाध्याय गिरिधरशर्मा चतुर्वेदी (बनारस), डॉ. बाबूराम सक्सेना (अलाहाबाद), पंडित राहुल सांकृत्यायन (मसुरी), डॉ. रघुवीर (नागपूर), मुनी  जीनविजयजी (मुंबई ) व डॉ. कुन्हनराजा (मद्रास) या मान्यवर विद्वानांचा समावेश होता.

तर्कतीर्थानी घटनेच्या कलम १ ते २६३ चे आणि संविधान दुरुस्ती कलमांचे भाषांतर केले, तर डॉ. मंगलदेवशास्त्री यांनी कलम २६४ ते ३९५ चे भाषांतर केले. अवघ्या तीन महिन्यांत वाईच्या प्राज्ञपाठशाळेत हे भाषांतर पूर्ण करण्यात आले. त्यानंतर तपासणी समितीने २१ दिवस बसून भाषांतराचे कलमवार वाचन करून दुरुस्तीसह अंतिम मसुदा लोकसभा सभापतींना सादर केला. लोकसभेने तो मंजूर केल्यानंतर अधिकृत संस्कृत घटना अस्तित्वात आली.

संस्कृत घटनेच्या भाषांतराची पहिली आवृत्ती प्राज्ञपाठशाळा मुद्रणालय, वाई येथे सन १९५२ ला मुद्रित करण्यात आली. हे मुद्रण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या देखरेखीखाली तयार झाले. त्याचे मुद्रितशोधन स्वत: तर्कतीर्थानी केले. त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या घटना दुरुस्तींचे संस्कृत भाषांतर करत, संस्कृत घटना अद्ययावत करून प्रकाशित करण्याचा प्रघात लोकसभा सचिवालयाने ठेवला आहे. लोकसभा ग्रंथालयात भारतीय संविधानाची संस्कृत प्रत उपलब्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. सुनीलकुमार लवटे, तर्कतीर्थाच्या साहित्याचे अभ्यासक