पंढरपूर: संत नामदेव महाराजांनी मानवतेचा विचार करून आपल्या साहित्यात लेखन केले. त्यांनी २२ राज्यांत जाऊन भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या बालकविताही मराठीत आहेत. हे सर्व विचार नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही निश्चित करू. संत नामदेवांचे अभंग पाठ्यपुस्तकात घेण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
येथे आयोजित श्री संतशिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ट्य शतकोत्तर संजीवन समाधी स्मृतिसोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, श्री नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की गुरू गोविंदसिंग, संत कबीर यांनी संत नामदेवांचा उल्लेख अत्यंत आदराने केला आहे. मीराबाई, नरसिंह मेहता यांच्या काव्यातदेखील नामदेव महाराजांचे विचार पाहायला मिळतात. भारताच्या सर्व दिशांना जोडण्याचे आणि खऱ्या अर्थाने भागवत धर्मातील विचार वैश्विक करण्याचे कार्य त्यांनी केले.
संत नामदेव महाराजांनी देशातील २२ राज्यांत भ्रमण करून भागवत धर्माचा विचार पोहोचविला. विठ्ठल मंदिरात चोखोबाची समाधी उभी करून विखंडित समाजाला, समाजात जन्माने नव्हे, तर कर्माने व्यक्ती मोठी होते, हा संदेश दिला. मराठीच्या गजलांचे मूळही संत नामदेवांपर्यंत पोहोचते. सर्व साहित्याची निर्मिती करताना हिंदी साहित्याला नवे भान देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी हिंदी आणि पंजाबीत अभंग लिहिले. ब्रज आणि शौरसेनी या भाषा त्यांना अवगत होत्या. भाषा हे संवादाचे साधन आहे, विवादाचे नाही, हे त्यांनी समाजाला पटवून दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी श्री संतशिरोमणी तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज नामदास व अन्य संतांचे पाद्यपूजन केले. संजीवन सोहळ्यानिमित्त बनविण्यात आलेल्या चांदीच्या विशेष नाण्याचे प्रकाशनही करण्यात आले.
संत नामदेव परिसर विकासाचे प्रयत्न – गोरे
संतशिरोमणी सावता महाराजांच्या स्मारकासाठी १५० कोटींचा निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. समाजातील लोकांनी परस्परांमधील लहान-मोठे मतभेद बाजूला ठेवून संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.