सुधीर जन्नू, लोकसत्ता

बारामती : बारामती शहरातील मुक्कामात हरिभक्तीचे चैतन्य फुलवित बुधवारी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाला. मार्गात काटेवाडी येथे परंपरेनुसार मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण झाले.

बारामती-काटेवाडी मार्गावर मोतीबा, पिंपळी ग्रेप, लिमटेकमध्ये दुसरी विश्रांती घेत पालखीने काटेवाडी येथे प्रवेश केला, त्या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. काटेवाडी गावामध्ये दोन महत्त्वाच्या परंपरा पाळल्या जातात. पहिली म्हणजे मुख्य मार्गावरून पालखी गावात जात असताना धोतराच्या पायघड्या घातल्या जातात. त्यानुसार परीट समाजाच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने पालखीच्या स्वागताला धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. विश्रांतीनंतर पालखी पुन्हा मार्गस्थ होताना मेंढ्यांच्या रिंगणाचा वैशिष्ट्यपूर्ण सोहळा रंगला. परंपरेनुसार धनगर समाजाकडून हा रिंगण सोहळा आयोजित केला जातो. मेंढयांचे आरोग्य उत्तम राहो, धनगर समाजाची व्यवसायात प्रगती होवो, अशी श्रध्दा या मागे असल्याची माहिती समाजातील व्यक्ती देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिंगण सोहळ्याला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. पुढे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. संत तुकोबांचा पालखी सोहळा आता बारामती तालुक्यामधून इंदापूर तालुक्यात प्रवेश केल्यावर साखर कारखान्याच्या वतीने अविनाश घोलप, रणजित निंबाळकर, सर्जेराव जामदार, राजेंद्र गावडे, नारायण कुळेकर, गणेश झगडे, भाऊसाहेब सपकळ, संजय मुळीक व ए. बी. जाधव आदींनी पालखीचे स्वागत केले. इंदापूरच्या सीमेवर पालखी सोहळा आल्यावर आमदार दत्तात्रय भरणे यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. या वेळी प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार, प्रांतअधिकारी उपस्थित होते. पालखी संध्याकाळी सणसर मुक्कामी पोहोचली. गुरुवारी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण बेलवंडी येथे रंगणार आहे.