विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सारंग श्रीनिवास पाटील यांनी आपला उमेदवारीअर्ज पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक या वेळी उपस्थित होते.
सारंग पाटील आपली भूमिका मांडताना म्हणाले, की मतदारसंघातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या पाच जिल्ह्यात सुमारे अडीच कोटी जनतेत किमान ५० लाख पदवीधर मतदार असावेत, त्यामुळे पुढील काळात पदवीधरांमध्ये त्यांच्या हक्काबाबत जागरूकता निर्माण करून जास्तीत जास्त पदवीधरांना मतदानाच्या कक्षेत आणणार आहे. पाचही जिल्ह्यांत मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्रे सुरू करून नोकऱ्या मिळाव्यात यासाठी इंडस्ट्री इंटरफेस सेंटर्स सुरू करणार आहे. तसेच पुणे महानगर परिसरात नोकरीच्या शोधात येणाऱ्या पदवीधर युवकांसाठी अत्यल्प दरात होस्टेल्स सुविधा व बसचे पास मिळावेत यासाठी पाठपुरावा करणार आहे. उद्योग व व्यावसायिक जगतात अनुभवसंपन्न असलेल्या ज्येष्ठ पदवीधरांचे संघटन करून स्वत:चा उद्योग अथवा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या पदवीधरांना व सुशिक्षित बेकारांना मार्गदर्शन, सहकार्य होण्यासाठी इंक्युपेशन सेंटर्स सुरू करणार आहे.
उच्चशिक्षित वर्ग म्हणून समाज पदवीधरांकडे पाहत असून, या पदवीधरांच्या पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा प्रतिनिधी होण्याची संधी मतदार मला देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांचेही सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.