Raj Thackeray : ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी मुद्यांवरून व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मोर्चा काढला होता. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली. यावेळी राज ठाकरे हे हिंदी सक्तीच्या मुद्यावरून चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं. “सरदार वल्लभभाई पटेल यांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

राज ठाकरे काय म्हणाले?

“राज्यातील इतर शाळांमध्ये तुम्ही मराठी सक्ती केली पाहिजे. ते सोडून तुम्ही हिंदी भाषा सक्ती करण्याच्या मागे लागलेला आहात? हे कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव आणतंय तुमच्यावर? केंद्र सरकार आतापासून नाही पूर्वीपासून अशा प्रकारचा दबाव आणतंय. काँग्रेसचं सरकार असल्यापासूनचं हे सर्व सुरु आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, त्यासाठीचा जो लढा होता तो मोठा लढा होता”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

“मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. तो कोणाचा होता तर काही गुजराती व्यापाऱ्यांचा आणि काही गुजराती नेत्यांचा होता. मी एकदा आचार्य अत्रेंचं पुस्तक वाचत होतो तेव्हा मला धक्का बसला. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडून बोललं गेलं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्वप्रथम सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका. देशाचे माजी गृहमंत्री आम्हाला आदरणीय होते. मोरारजी देसाई यांनी मराठी माणसावर गोळीबार केला होता. ज्यांना आम्ही लोहपुरुष म्हणून मानत आलो त्यांनी असं सांगितलं. आम्ही त्यांच्याकडे आदराने पाहत आलो. पण त्यांनी महाराष्ट्राला विरोध केला”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘हिंदीला २०० वर्षांचा इतिहास, तर मराठी तीन हजार वर्षांचा इतिहास’

“आपण कोणती हिंदी घेऊन बसलो आहोत? हिंदी भाषेला साधा २०० वर्षांचा इतिहास आहे. पण मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. हिंदी ही भाषा या देशात कोणाचीही मातृभाषा नाही. ज्याच्या काल परवा कानाखाली मारली ना त्यालाही विचारा की त्याची मातृभाषा कोणती आहे? हिंदी ही इकडून तिकडून तयार झालेली २०० वर्षांपूर्वीची भाषा”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हिंदीने २५० भाषा मारल्या’ : राज ठाकरे

“उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानला हे समजलं पाहिजे. हिंदी या भाषेने किती भाषा मारल्या, तर हिंदीने जवळपास २५० भाषा मारल्या. त्यामध्ये कांगणी, गडवाली, अवधी, भोजपूरी, माळवी, मारवाडी अशा अनेक भाषा हिंदीने मारल्या. आता बिहारने हिंदी स्वीकारली असली तरीही ९० टक्के लोक हे त्यांच्या मातृभाषेत बोलतात. मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रात का येतात? जर हिंदी भाषेमुळे तुमचं भलं झालं नसेल, तुमची राज्ये मोठी झाली नसतील आणि तुम्हाला जर इकडे येऊन नोकऱ्या मागाव्या लागत असतील तर मग हिंदी भाषेने तुमचं काय भलं केलं?”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.