कराड : लोकसभेचा सातारा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ‘तुतारी’ चिन्हावरील उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीत घोटाळा करतो हे खूपच लांच्छनास्पद असल्याचा हल्लाबोल आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर चढवला.

एका-एका प्रकरणांचा उलगडा करणार घोटाळेबाजाच्या एका-एका प्रकरणांचा उलगडा आम्ही त्या-त्यावेळी करणार असल्याचा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिला. कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना पाटील ते पुढे म्हणाले, अशा घोटाळेबाजाला उमेदवारी मिळते याचे खूप वाईट वाटते. याबद्दल आम्ही शरद पवारांना काहीच बोलू शकत नाही.

आणखी वाचा-ओमराजे, अर्चना पाटील, संयोजिनी राजे यांनी घेतले उमेदवारी अर्ज, लोकसभेसाठी चौथ्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल

शिंदेंना ‘रिटर्न गिफ्ट’ देणार

सातारा लोकसभेचा सन २०१९ च्या निवडणुकीत मी उमेदवार होतो. सध्याच्या उमेदवारांनी त्यावेळी बेंबीच्या देठापासून आपणाला प्रत्यक्षात विरोध केला. एका माथाडी चळवळीत काम केल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी आम्ही व माझ्या परिवाराने प्रयत्न केलेत. त्यांचा शेवटचा विजय कोरेगाव विधान मतदारसंघातून झाला. सन २०१९ मध्ये आमच्यातील काहींनी त्यांना हाताशी धरून आमच्या विरोधात कटकारस्थान रचले. आता ते उमेदवार असल्याने त्यांना ‘रिटर्न गिफ्ट’ देण्याची संधी आलीय. निवडणुकीचा अजून बराचसा काळ बाकी आहे. त्यात एका-एका प्रकरणाचा उलगडा करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

त्यांनी जामीन का घेतला?

शशिकांत शिंदेंनी निवडणूक आली की, काहीतरी प्रकरणे काढून रडीचा डाव खेळू नका असा खिल्ली महायुतीच्या नेत्यांची उडवली असल्याकडे लक्ष वेधले असता, शशिकांत शिंदे यांनी जर काहीच केले नसेल तर त्यांनी घाबरायची गरज नाही. मुतारीच्या घोटाळ्यात त्यांनी जामीन का घेतला, लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याअगोदरच एक नवीन गुन्हा उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. बाळासाहेब सोळस्कर त्यावेळी अध्यक्ष होते आणि शशिकांत शिंदे संचालक होते. त्यामुळे त्यांना काहीच केले नाही असे वाटत असेल तर त्यांनी घाबरायची गरज नसल्याचे नरेंद्र पाटील म्हणाले.

आणखी वाचा-जतचे माजी आ. जगताप यांचा भाजपचा राजीनामा, विशाल पाटलांचा प्रचार करणार

माथाडी नेता कोण ते दिसेल

भाजपने माथाडी कामगारांत फूट पाडण्याचे काम केल्याचा आऱोप शशिकांत शिंदेंनी केला असल्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडवत असल्यास फूट कुणी पाडली? माथाडींच्या प्रमुख प्रश्नांवर ज्या पक्षाने कधीही गांभीर्याने पाहिले नाही. ज्यांनी काँग्रेस सोबत जावून माथाडींचे प्रश्न प्रलंबित ठेवण्याचे काम केले. तरी अशा उमेदवाराला आम्ही उत्तर काय द्यायचे असा सवाल करून, आता खरा माथाडीचा नेता कोण, माथाडी कामगार कोणाच्या पाठीशी आणि खऱ्याअर्थाने माथाडी कामगारांच्या समस्या कोण सोडवतोय हे लवकरच दिसून येईल असे नरेंद्र पाटील यांनी या वेळी बोलताना सांगितले.