सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राजे बिनविरोध

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतल्याने उदयनराजेंचा सत्ताधारी पॅनेलमध्ये प्रवेश झाला.

दिग्गज नेत्यांवर निवडणूक लढण्याची वेळ

विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संघर्ष टाळत प्रमुख नेत्यांनी समन्वयाची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्न केला. सत्ताधारी सहकार पॅनलसाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील व बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेली शिष्टाई कामाला आली. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या  व उमेदवारी माघार घेण्याचा अखेरच्या दिवशी विधान परिषदेचे सभापती व बँकेचे संचालक रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांच्या सह ११संचालक बिनविरोध निवडून आले.

बँकेची निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित झाले होते पण राष्ट्रवादीने सत्ताधारी सर्वपक्षीय पॅनल चा मुद्दा लावून धरला होता. रविवारी  उर्वरित दहा जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत  खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अखेरच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवेंद्रसिंहराजेंची मनधरणी केल्यानंतर उदयनराजे यांचा मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीत सर्वाधिक मते सातारा तालुक्यात असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पहिल्यापासून जादा जागा जागांची मागणी केली होती. या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे यांना संचालक मंडळात घेण्यासाठी पहिल्यापासून विरोध होता.

खासदार उदयनराजे भोसले यांना सत्ताधारी पॅनेलमध्ये घ्यावे असा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचा आग्रह व उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केल्या नंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतल्याने उदयनराजेंचा सत्ताधारी पॅनेलमध्ये प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली नाही. याविषयी अधिक बोलण्यास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नकार दिला, तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.  कराड सोसायटी मतदारसंघातून बाळासाहेब पाटील बिनविरोध येतील असे वाटत असताना प्रत्यक्षात तसे झाले नाही. महिला राखीवच्या उमेदवारीवरून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या विषयावरून वाद झाल्याने अखेर या गटात निवडणूक लागली. खटाव सोसायटी मतदार संघात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना  उमेदवारी न देता नंदकुमार मोरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने घार्गे यांनी बंडखोरी केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई व आमदार शशिकांत शिंदे यांची ही सोसायटी गटातील निवडणूक. या तिघांविरोधात तगडे विरोधक असल्याने महाविकास आघाडी सरकारमधील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर आमदार शशिकांत शिंदे यांना त्यांच्या घरच्या जावळी सोसायटी गटात पराभूत करण्याचे डावपेच शिवेंद्रसिंहराजेंनी आखले आहेत. 

काय घडले?

* खासदार उदयनराजे भोसले यांना सत्ताधारी पॅनेलमध्ये घ्यावे असा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचा आग्रह होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही तसा आग्रहक केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतल्याने उदयनराजेंचा सत्ताधारी पॅनेलमध्ये प्रवेश झाला.

* या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली नाही. याविषयी अधिक बोलण्यास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नकार दिला तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.

* कराड सोसायटी मतदारसंघातून बाळासाहेब पाटील बिनविरोध होतील असे वाटत असताना प्रत्यक्षात तसे झाले नाही. महिला राखीवच्या उमेदवारीवरून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या विषयावरून वाद झाल्याने अखेर या गटात ही निवडणूक लागली.

* खटाव सोसायटी मतदारसंघात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी न देता या ठिकाणी नंदकुमार मोरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने प्रभाकर घार्गे यांनी बंडखोरी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Satara district bank election 11 directors were elected unopposed zws

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!