सातारा : सुरूर ते वाई दरम्यानच्या रस्त्यालगत असलेल्या दीडशे वर्षांपूर्वीपासूनच्या देशी झाडांचे सौंदर्य आणि वैभव जपा. रुंदीकरणात एकाही झाडाला हात लावू नका अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिला. ही झाडे भराव करून सुरक्षित करावीत. स्थानिक व पर्यटकांच्या वाहनांना अडथळा होणार नाही, असे नियोजन करून टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरण करण्यास गती द्या, अशी सूचनाही पाटील यांनी या वेळी केली.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ (एमएसआयडीसी) यांच्यामार्फत पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, सुरूर भाडळे, दहिवडी या राज्य महामार्गावर सुरूर ते महाबळेश्वर वाडा कुंभरोशी तसेच पारगाव यवत, कापूरहोळ, भोर, मांढरदेव, वाई, शहाबाग, सुरूर या दोन रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये रस्त्यालगतची झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे, तसेच रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतुकीची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांची आढावा बैठक घेतली.
या वेळी पाटील यांनी या रस्त्यावरील वाहतुकीसाठी पर्यायी उपाययोजना न करता एकाच वेळी सर्वच रस्त्याची खोदाई केल्याबद्दल नाराजी व्यक्त करून ठेकेदार व अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सुरूरच्या बाजूने येणारी सर्व वाहतूक जोशीविहीर व पाचवडमार्गे, तर महाबळेश्वर बाजूने येणारी वाहतूक सुरूरमार्गे अशी एकेरी सुरू केली होती. मात्र, पर्यटन महोत्सवामुळे त्यामध्ये बदल करावा लागला. त्यामध्ये बदल करून पाटील यांनी आता पुन्हा एकेरी वाहतूक सुरू करून त्या ठिकाणी वाहतुकीतील बदलाचे फलक लावावेत, तसेच पाचवड, जोशीविहीर, ओझकें, कवठे, बोपेगाव, खानापूर या रस्त्यावर आवश्यक तेथे गतिरोधक बनवून त्याचे फलक लावावेत. वाई औद्योगिक वसाहत तसेच शहाबाग- वाई रस्त्यावरील खड्डे त्वरित दुरुस्त करावेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारे पक्की व योग्य पद्धतीने करावीत, शहरातील चौपदरीकरणाचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण होईल, असे नियोजन करावे. कामाची गुणवत्ता सांभाळा, तसेच विनाकारण तक्रारी वाढणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या वेळी राज्य पायभूत सुविध विकास मंडळाचे अधीक्षक अभियंता वनगोसावी, कार्यकारी अभियंता नायकवडी, प्रकल्प व्यवस्थापक समीर रहाटे, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण विभाग) पुण्याच्या कार्यकारी अभियंता श्रीमती भंडारे, उपअभियंता श्री. आगळे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता महेश गोंजारी, तहसीलदार सोनाली मेटकरी, पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, नायब तहसीलदार वैभव पवार, भाऊसाहेब जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पर्यावरणप्रेमी प्रशांत डोंगरे, भाऊ मेहता, फुलेनगर व शहाबाग ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्त्याची रुंदी कमी होणार…
सध्या सात मीटर रुंदीचा रस्ता असून, १० मीटर रुंद प्रस्तावित आहे. झाडे वाचविण्यासाठी काही ठिकाणी सात, काही ठिकाणी आठ मीटर, तर काही ठिकाणी दहा मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे. सध्याचे सुरू असलेले काम जुलैअखेर पूर्ण होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.