माण-खटाव तालुक्यतील सर्वपक्षीय आघाडीचा उमेदवार अखेर ठरला. या ठिकाणी अनिल देसाई यांच्या नावावर एकमत झाले आहे. देसाई हे जिल्हा भाजपचे पदाधिकारी आहेत. काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून ते बंडाच्या पवित्र्यात आहेत. माण खटाव मधून जयकुमार गोरे भाजपची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
माण मतदारसंघात यावेळी ‘जयकुमार गोरे हटाव’चा नारा देत सर्वपक्षीय नेत्यांनी ‘आमचं ठरलंय’ आघाडी काढली. या आघाडीने आपल्यातून सर्वसमावेशक एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्यात अर्ज भरण्याची वेळ आली तरी एकमत झाले नव्हते. अनेक बैठकांनंतर अनिल देसाई यांच्या नावावर एकमत झाले.
दरम्यान, यासंदर्भात सोमवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी दिलीप येळगावकर, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, रणजित देशमुख, सुरेंद्र गुदगे आदी उपस्थित होते. यावेळी अनिल देसाई म्हणाले, “मी पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढणार आहे. प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी राहील. आता युतीचे उमेदवार जयकुमार गोरे की शेखर गोरे यापैकी कोण असेल याची उत्सुकता आहे. आघाडीचा मतदारसंघ काँग्रेसचा होता, पण आता त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. आम्ही कोणी राष्ट्रवादीचे तिकीट घेणार नाही, कारण हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रदीर्घ चर्चा होऊन आम्ही याबाबत निर्णय घेतला असल्याचे दिलीप येळगावकर म्हणाले. तीन-चार दिवस आम्ही सर्वांच्या मतांवर विचार केला. उमेदवारीसाठी आम्ही बरेच जण इच्छुक होतो. परंतु चर्चेअंती एकमत झाल्यानं आम्ही अनिल देसाई यांना उमेदवारी अंतिम केली आहे, असे प्रभाकर घार्गे म्हणाले.