सातारा: रणजितसिंह, जयकुमार गोरे आणि आमच्यात संघर्ष आहे म्हणून काय आम्ही एकमेकांचे कपडे धरायचे का? शत्रुत्व हे कायम नसते. कुठे थांबायचं हे आम्हाला चांगलं कळतं, असे जाहीर मतप्रदर्शन करत रामराजे नाईक निंबाळकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपलेल्या या वैरभावावर तडजोडीची फुंकर मारली. विशेष म्हणजे रामराजे ही भूमिका मांडत असताना त्याच व्यासपीठावर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते. त्यांच्या या राजकीय नरामाईच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
रामराजे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय वैर हे सर्वश्रूत आहे. यातूनच त्यांनी राजकीय कुरघोड्या करत सातत्याने एकमेकांना अडचणीत आणले. रामराजे हे महायुतीत असतानाही त्यांच्या गटाने लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात भूमिका घेत रणजितसिंह यांच्या पराभवात हातभार लावला होता. या पराभवानंतर हे शत्रुत्व आणखी वाढीस लागले होते. ज्यातून रामराजे यांच्या गटाचा फलटणमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. अनेक सत्तास्थानांवर त्यांना पाणी सोडावे लागून सतत संघर्षाची वेळ आली. या पार्श्वभूमीवर रामराजे यांनी घेतलेली ही नरमाईची भूमिका सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे.
फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंद व इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात रामराजे यांनी हे मतप्रदर्शन केले. या वेळी व्यासपीठावर खुद्द माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने रामराजे व रणजितसिंह हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने सातारकरांचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले होते. या वेळी रामराजे काय बोलणार याची उत्सुकता होती. या वेळी रामराजे म्हणाले, की आम्ही दोघेही एकाच व्यासपीठावर आल्याने सर्वांनाच त्याचे आश्चर्य वाटत आहे. आमच्यात राजकीय संघर्ष आहे. मतभेदही आहेत. तुम्ही याला भांडण म्हणता परंतु आमच्यासाठी हे मतभेद आहेत. हे मतभेद आहेत म्हणजे आम्ही एकमेकांचे कायम कपडे धरायचे का? रणजितसिंह आणि मला आमच्या मर्यादा माहिती आहेत.
जयकुमार गोरे आणि माझेही काही वैयक्तिक भांडण नाही. माझ्याविषयी त्यांच्या मनात जी अढी निर्माण झाली ती दूर करण्यासाठीही मी लवकरच प्रयत्न करणार आहे. संघर्ष किती करायचा, शत्रुत्व किती धरायचे आणि कुठे थांबायचं हे त्यांना आणि मलाही चांगले माहिती आहे. त्याची काळजी बाकीच्यांनी करू नये, असे मतप्रदर्शन करत रामराजे यांनी गेली अनेक वर्षे जपलेल्या शत्रुत्वावर आपली तडजोडीची भूमिकाच जाहीर केली. दरम्यान या वेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी या विषयाला संपूर्णपणे बगल देत आपले भाषण केले.
विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. गावपातळीवरील कार्यक्रम, विकासकामांपासून ते कुठल्याही मोठ्या निवडणुकांपर्यंत हे दोन्हीही गट एकमेकांवर तुटून पडत असल्याचे पाहण्यास मिळते. या पार्श्वभूमीवर रामराजे यांनी घेतलेली ही नरमाईची भूमिका सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे.