सातारा: वाई येथील लो. टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेचे १०९ वे ज्ञानसत्र १ ते २१ मे या कालावधीत संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्या ‘ साहित्य आणि चित्रकला ‘ या विषयावरील मुलाखतीने होणार आहे. तर समारोप सिने अभिनेते अमोल पालेकर व चित्रपट दिग्दर्शिका संध्या गोखले यांची ‘जीवन नाट्याचा चित्रमय ऐवज’ या विषयावरील मुलाखतीने होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी केळकर आणि वसंत व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्षा तनुजा इनामदार यांनी दिली.

मागील शंभर वर्षे ही वसंत व्याख्यानमाला अखंडितपणे सुरू आहे. येथील गणपती घाटावर दररोज सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

व्याख्यानमालेत १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सहा वाजता वाईतील भगिनी शिव तांडव स्तोत्र प्रस्तुत करणार आहेत. या शिवाय संस्थेच्या तळमजल्यावरील कला दालनात २ ते १२ मे पर्यंत मिथिलेश गिरीश जाधव यांचे मराठा चित्रशैलीतील वॉटर कलर पेंटिंग्जचे तर १३ ते २१ मे पर्यंत कलाशिक्षक बाळासाहेब कोलार यांचे संमिश्र वॉटर कलर पेंटिंग्जचे चित्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यंदाच्या व्याख्यानमालेत अनुक्रमे मीनाक्षी पाटील, इतिहास अभ्यासक मृण्मय अरबुने, नाटककार व दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर, डॉ. बबन डोळस व डॉ. समीर दातार, डॉ. दत्ता कोहिनकर, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, पद्मश्री अच्युत पालव, अभिनेता आणि पटकथा लेखक अभिराम भडकमकर, श्रेया राजवाडे व सहकारी, इतिहास संशोधक डॉ. चैतन्य साठे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, विधीज्ञ डॉ. गणेश शिरसाठ, महाराष्ट्र बार कॉन्सिलचे सदस्य ॲड. रोहित एरंडे, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, डॉ. मधुबाला चिंचाळकर, सी. ए. डॉ. अभिजीत फडणीस, श्री. केदार पटवर्धन, शल्यचिकित्सक डॉ. शेखर कुलकर्णी, गड दुर्ग अभ्यासक श्री. शेखर राजेशिर्के, श्री. श्रीकांत जाधव आदी वक्ते आपली अभ्यासपूर्ण मते मांडणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवार ता. २१ मे रोजी अमोल पालेकर व संध्या गोखले यांच्या ‘जीवन नाट्याचा चित्रमय ऐवज’ या विषयावरील मुलाखतीने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. महाराष्ट्रात शतक पूर्ण केलेल्या ठरावीक व्याख्यानमालेमध्ये वाईची व्याख्यानमाला अग्रस्थानी असल्याची माहिती व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्षा तनुजा इनामदार यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, कार्यवाह भद्रेश भाटे, सहकार्यवाह माया अभ्यंकर, विश्वस्त अनिल जोशी, ॲड. श्रीनिवास कुलकर्णी, श्रीनिवास खरे, आदित्य चौंडे, अनुराधा कोल्हापुरे, गिरीश जाधव, अजित क्षीरसागर, ग्रंथपाल अमित वाडकर आदी उपस्थित होते.