सातारा : वाद्य वाजून इशारा होताच दोन्ही गावांतील त्या शेकडो महिला एकमेकींकडे पाहत हातवारे करत चक्क शिव्या घालू लागल्या. शिव्यांची ही लाखोली वाहताना डफडे, शिंग, तुतारीचा आवाजही होऊ लागले आणि पाहता पाहता शिव्यांचा उत्सव रंगला! नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साताऱ्यातील सुखेड व बोरी (ता खंडाळा) गावादरम्यान ‘बोरीचा बार’ नावाने रंगणारा हा आगळा वेगळा उत्सव यंदाही उत्साहात पार पडला. त्यात दोन्ही गावांतील चारशेहून अधिक महिलांनी भाग घेतला तर ही परंपरा पाहण्यासाठी या वेळी हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली.

सुखेड व बोरी या गावांतील महिला मागील अनेक वर्ष परंपरागत पद्धतीने नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बोरीचा बार भरवतात. दुपारी बारानंतर दोनही गावांतील महिला गावाच्यामधून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठावर येऊन शिव्यांची लाखोली वाहतात. एकमेकींना शिव्या देण्याची परंपरा म्हणजेच ‘बोरीचा बार’ आहे. या वर्षी बोरीचा बारबाबत सर्वांना उत्सुकता होती.

आज दुपारी बाराच्या सुमारास या दोन्ही गावांतील चारशेहून अधिक महिला या ओढ्या काठी दोन्ही गावांच्या तीरावर जमल्या. बरोबर बारा वाजता डफडे, ताशा, शिंग आदी वाद्ये वाजू लागताच सुखेड गावच्या महिलांनी हातवारे करत समोरच्या बोरी गावातील महिलांना शिव्या (बार घालू) देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी बोरी गावातील महिलांनीही हातवारे करीत बार घालण्यास सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बार घालणाऱ्या(शिव्या देणाऱ्या) महिला हातवारे करीत शिव्यांची लाखोली वाहू लागल्या तसे त्यांना साथ देत डफडे, शिंग, तुतारीचा आवाज घुमू लागले. जमा झालेल्या महिलाही टाळ्या वाजवून उत्साह वाढवू लागल्या. या वेळी त्यांचा आवेश हा एकमेकींना आव्हान देणारा होता. बघ्यांची गर्दीही या महिलांना चिथावणी देत होती. हळूहळू शिव्यांचा हा फड रंगत गेला आणि त्यातून ‘बोरीचा बार’ पार पडला. पाऊण तास हा बार सुरू होता. तो संपल्यावर परंपरेचे पालन झाल्यावर या महिलांनी आपआपल्या गावात जाऊन झिम्मा फुगडी, फेर धरणे, आदी खेळ खेळले. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.