केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर शिंदे गटाचा दावा मान्य केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आता काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१९ फेब्रुवारी) अहमदनगरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना बोलत होते.

सत्यजीत तांबे म्हणाले, “हा विषय फार तांत्रिक आहे. कारण एका बाजूला त्या पक्षाची घटना आणि दुसऱ्या बाजूला लोकांचा पाठिंबा असा मुद्दा आहे. अशात निवडणूक आयोगाने खूप तांत्रिकपणे हा निर्णय दिला आहे. त्यामुळे तो निर्णय समजून घेणं आणि त्यावर अभ्यास करणं हे कायदेपंडितांचा विषय आहे.”

“…म्हणून मला या विषयावर टिपण्णी करण्याची गरज नाही”

“म्हणून मला असं वाटतं की हा खूप किचकट कायदेशीर प्रक्रियेतून झालेला निर्णय आहे. त्यामुळे मला त्यावर अधिकचं माहिती नाही. मी अपक्षच आहे. त्यामुळे मला या विषयावर फार टिपण्णी करण्याची गरज नाही,” असंही सत्यजीत तांबे यांनी म्हटलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : शिवसेनेची कार्यालयं, देणग्या, संपत्ती आणि निधीवर कोणाचा अधिकार? कायदेतज्ज्ञ श्रीहरी अणे स्पष्टच म्हणाले…

“मी खासदार सुजय विखे यांच्याशी संपर्क केला होता”

भाजपा खासदार सुजय विखेंना भेटणार का? या प्रश्नावर सत्यजीत तांबे म्हणाले, “मी खासदार सुजय विखे यांच्याशी संपर्क केला होता. मी लवकरच त्यांना भेटणार आहे. ते सध्या परदेशात आहेत. ते इकडे आल्यानंतर मी त्यांनाही भेटेन.”

“”मला सगळ्याच राजकीय पक्षाच्या त्यांनी मदत केली”

“मला सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मदत केली आहे. मी त्याचं कारण सांगितलं आहे. आमचा ऋणानुबंध सगळ्यांशी आहे. आम्ही राजकारण फक्त निवडणुकीपुरतं करतो. निवडणूक संपली की, आम्ही सगळ्यांना मदत करतो,” असं मत सत्यजीत तांबेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ट्विटर हँडलचं ब्ल्यू टिक गेलं, वेबसाईटही बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…त्यामुळेच आम्हाला सगळे मदत करत असतात”

“विचाराची लढाई विचारांनी लढता येते. त्यासाठी रोजच राजकारण केलं पाहिजे, असं गरजेचं नाही. हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळेच आम्हाला सगळे मदत करत असतात आणि आम्हीही सर्वांना मदत करत असतो. त्यामुळे जशी परिस्थिती निर्माण होईल तशी भूमिका घेतली जाईल,” असं सूचक वक्तव्यही सत्यजीत तांबेंनी केलं.