विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. प्रदेश काँग्रेसने मला चुकीचे एबी फॉर्म दिले. तसेच तांबे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, असे सत्यजित तांबे म्हणाले आहेत. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव घेत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक टीका केली आहे. देशपातळीवर राहुल गांधी भारत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र राज्य पातळीवर आम्हाला बदनाम करण्यासाठी कट रचण्यात आला, असेही तांबे म्हणाले. ते आज (४ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकाच उमेदवाराचे नाव दिल्लीतून का जाहीर झाले?

“मला दोन चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचण्यात आलं. त्यासाठी स्क्रीप्ट तयार होती. त्याचाच एक भाग म्हणून माझ्या माणसाला बोलवून बंद पाकिटात फॉर्म देण्यात आले. ते फॉर्म चुकीचे निघाले. नंतरही आम्हाला चुकीचा फॉर्म देण्यात आला. ते म्हणतात की मुलाने उभे राहायचे की वडिलांनी उभे राहायचे, हा निर्णय तांबे परिवाराला घ्यायचा होता.मग माझ्या वडिलांची उमेदवारी दिल्लीतून का जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव दिल्लीतून जाहीर झाले नाही. एकाच उमेदवाराचे नाव दिल्लीतून का जाहीर झाले. हा एक कट होता. बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी हा कट करचण्यात आला,” असे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो म्हणतात, मात्र…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझे दिल्लीमधील काँग्रेसशी बोलणे सुरू होते. माझी चूक नसताना मी माफी मागायला तयार होतो. तसे मी पत्रही पाठवले होते. मात्र मी पत्र पाठवल्यानंतर दोन तासांत महाविकास आघाडीने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला. एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो म्हणतात. ते प्रेमाने लोक जोडा म्हणतात. मात्र राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी द्वेषापोटी आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतुपूर्वक हा सर्व प्रकार केला. माझ्या पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून मी यापुढे या विषयावर परत बोलणार नाही,” अशा भावना सत्यजित तांबे यांनी व्यक्त केल्या.