सावंतवाडी : सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावरील नेमळे तिठ्यावर दिशा दाखवण्यासाठी लावण्यात आलेले फलक चुकीच्या माहितीमुळे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेक वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी या फलकांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही फलके एखाद्या अडाणी आणि अशिक्षित व्यक्तीने तयार केल्यासारखी वाटत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
नेमळे तिठ्यावर लावण्यात आलेल्या एका फलकावर ‘आडेली’ ऐवजी ‘अडली’ असा चुकीचा शब्द लिहून मराठी भाषेचं विडंबन करण्यात आलं आहे. या ठिकाणी खरेतर कामळेवीर आणि वेंगुर्लाकडे जाणारे मार्ग दाखवणारे फलक असणे अपेक्षित आहे, पण त्याऐवजी ‘अडली’ असा फलक लावण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला, आंबोली, सावंतवाडी, आकेरी आणि माणगाव या गावांकडे जाणाऱ्या मार्गाची माहिती देणे गरजेचे असताना, तिथे ‘निरूखे’ असा फलक लावण्यात आला आहे. ‘निरूखे’ हे स्वतंत्र गाव नसून, कोलगावमधील एक वाडी आहे. त्यामुळे, दिशा दाखवण्यासाठी निरूखेचा उल्लेख करणे चुकीचे आहे.
प्रवासी आणि वाहन चालकांचे असे म्हणणे आहे की, हे दिशादर्शक फलक लावताना ठेकेदाराने (कॉन्ट्रॅक्टरने) स्थानिक लोकांशी सल्लामसलत केलेली दिसत नाही किंवा ज्यांच्याकडे हे काम सोपवले गेले त्यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नाही. अशा गंभीर चुकांमुळे प्रवाशांची दिशाभूल होऊ शकते. या चुकीच्या फलकांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे. त्यांनी संबंधित विभागाकडे तात्काळ चौकशी करून हे फलक काढून टाकण्याची आणि त्या जागी योग्य व सोयीस्कर फलक लावण्याची मागणी केली आहे.