मृत व्यक्तीला विद्यार्थी दाखवून संस्था संचालकांनी शिष्यवृत्ती उचलल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात समोर आला असून, सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाचा दुरुपयोग करूनही शिष्यवृत्ती लाटली गेली आहे. अशा संस्थाचालकांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आता सर्वपक्षीय विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत.
गडचिरोलीतील बहुचर्चित १८ कोटींच्या शिष्यवृत्ती प्रकरणात दररोज नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या जिल्ह्य़ातील सुमारे २५ शिक्षण संस्थांच्या कागदपत्रांची तपासणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सुरू केली आहे. यात बहुतांश शिक्षण संस्थाचालकांनी मृत व्यक्तीला विद्यार्थी दाखवून त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती उचलल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गडचिरोलीतील सावित्रीबाई फुले इस्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये चंदू तुकाराम नैताम या विद्यार्थ्यांचा प्रवेश २०१३-१४ मध्ये डिप्लोमा इन कॉम्यूटर ग्राफिक्स या अभ्यासक्रमाला दाखविण्यात आला, तसेच त्याच्या नावाने शिष्यवृत्तीचे ३५ हजार रुपये काढले आहेत. मात्र, या मुलाचा मृत्यू २१ नोव्हेंबर २०१२ मध्ये अपघातात झाला. असे असतांनाही त्याची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचे बनावट प्रमाणपत्र, तसेच उत्पन्नाचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र तयार करून त्याचा प्रवेश दाखविला गेला. त्याच्या नावावर २०१४ मध्ये शिष्यवृत्तीही उचलण्यात आलेली आहे. केवळ चंद्र नैताम या मृत व्यक्तीच्या नावावरच नाही, तर बहुसंख्य संस्थांनी मृत व्यक्तींना आपल्या महाविद्यालयातील विद्याथी म्हणून दाखविल्याचे तपास अधिकारी रवींद्र पाटील यांनी सांगितले.
चंदू नैताम याचे मृत्यू प्रमाणपत्र दाखविल्यानंतरही संस्था संचालक हा गैरव्यवहार झाल्याचे मान्य करीत नव्हते. या व्यक्तीचा प्रवेश दाखवितांनाच त्याच्या नावाचे महाविद्यालयाचे ओळखपत्र तयार केले गेले.
या ओळखपत्रावर प्राचार्यांची स्वाक्षरीही आहे. चंदू नैताम यांची बहीण पोलिस खात्यात नोकरीला आहे. तिच्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आले. हे गैरव्यवहार करतांना सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचाही दुरुपयोग केला गेला आहे. महात्मा गांधींपासून शिवाजी महाराज, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सरदार पटेल आदी नेत्यांच्या नावांवर बनावट महाविद्यालये उघडून शिष्यवृत्तीची रक्कम उचलण्यात आली असल्याचे प्रकार उघड होत आहेत.