इंडियन मुजाहिदीनचा कथित दहशतवादी अफजल उस्मानी हा मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यानंतर राज्यभर त्याचा शोध घेतला जात आहे. मुंबईच्या एका पथकाने दोन दिवस श्रीरामपूर शहरात येऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच उस्मानीची माहिती मिळाल्यास ती कळविण्याचे आवाहन केले.
श्रीरामपूरचे नाव राज्यात गुन्हेगारी जगताचे केंद्र म्हणून पुढे आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांचा शोधही दहशतवाद विरोधी पथकाने शहरात घेतला होता. त्यांच्या कारवाईत फरार गुन्हेगार चन्या बेग हा हाती लागला. पण त्याचा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येशी सबंध नसल्याचे आढळून आल्यानंतर त्यास शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शहरातील काही गुन्हेगारांचे दहशतवाद्यांशी सबंध असल्याचे पूर्वी आढळून आले आहे. त्यामुळे उस्मानी फरार झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी नवी मुंबई शाखेचे एक पथक शहरात आले. काही लोकांना बोलावून त्यांनी चौकशी केली. तसेच काही माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले. या चौकशीपासून त्यांनी स्थानिक पोलिसांना दूर ठेवले होते. पत्रकारांची त्यांची भेट झाली असता माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
उस्मानी याच्या शोधासाठी १८ पथके तयार करण्यात आली आहेत. ते राज्यभर उस्मानीचा शोध घेत आहेत. मनमाड येथेही त्यांनी काही संशयितांची चौकशी केली. रेल्वेस्थानक व बसस्थानकावर उस्मानीचा शोध घेतला. शहरात दोन दिवस हे पथक ठाण मांडून होते. पण त्यांना हात हलवत परत जावे लागले. कुठलीही माहिती त्यांना मिळाली नाही. उस्मानी याला राज्यात कुठेही आश्रय मिळू नये म्हणून मुंबई पोलिसांनी व्यूहरचना केली असून शहरात त्यासाठीच हे पथक आले होते. काही लोकांना त्यांनी उस्मानीला आश्रय देऊ नका, तसेच कुणी देण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला कळवा असे आवाहन केले. त्यांच्या प्राथमिक चौकशीत उस्मानी शहरात आला नव्हता, त्याने कुणाशीही संपर्क केला नाही असे आढळून आले.