‘तूर खरेदीबाबत सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे’ असं मत शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केलं. ‘मराठवाड्यात तुरीचं विक्रमी उत्पादन झालं असून शेतकऱ्यांच्या घरात २० ते २५ टक्के तूर शिल्लक आहे’ असं सांगत त्यांनी हे मत व्यक्त केलं होतं. उध्दव ठाकरेंनी निर्देश दिल्याप्रमाणे त्यांचे मराठवाड्यामध्ये ‘शिवसंपर्क’ अभियान राबवण्यात येत आहे. त्या अभियानासाठी उल्हास पाटील परभणीत होते तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर ते बोलत होते.
मराठवाड्यातल्या ४६ तालुक्यातले शिवसेनेचे आमदार, मुंबईतले नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
“कापसाला आणि तुरीला हमीभाव मिळालेला नाही. दोन वर्षापूर्वीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडे नाराजी व्यक्त केली आहे” आमदार उल्हास पाटील म्हणाले. उल्हास पाटील यांच्यासोबत आमदार राहुल पाटीलही उपस्थित होते. परभणी तालुक्यातल्या असोला, पिंगळी, मुरंबा या गावांना त्यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसंपर्क अभियानादरम्यान मिळालेली माहिती अहवाल औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठवाडय़ात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तसेच नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना घसरणीला लागली आहे. या निमित्ताने राजकीय बांधणीचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. ७ मे रोजी उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आमदारांची संपर्क बैठकही घेणार आहेत.
शेती समस्यांची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते मराठवाडय़ात दरवर्षी येतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्यामागे मुलींच्या लग्नाचा न झेपणारा खर्च असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेकडून सामूहिक विवाह सोहळय़ांचे आयोजनही मोठय़ा प्रमाणात करण्यात आले होते. काही जिल्हय़ात शिवजलक्रांती योजनाही सुरू करण्यात आली होती. मात्र, मराठवाडय़ात नेमलेल्या पालकमंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. स्थानिक पदाधिकारी व पालकमंत्र्यांचे वाद असल्याने सेनेच्या कामगिरीवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर मध्यावधी निवडणुका झाल्या तर काय रणनीती असावी यासाठी विशेष बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.