ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत दिलीप पाडगावकर (वय ७२) यांचे आज पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात निधन झाले. पाडगावकर किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ मे १९४४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या २४ वर्षी पत्रकारितेला सुरूवात केली होती. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती. पटकथा-दिग्दर्शन पदवीही त्यांनी मिळवली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यांची पॅरिस प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. १९७८ ते १९८६ या कालावधीत त्यांनी युनेस्कोत बँकॉक आणि पॅरिससाठी काम केले होते. १९८८ मध्ये त्यांची टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर ते तब्बल सहा वर्षे होते. २००२ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित केले होते.

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती. काश्मीरमधील सर्व घटकांशी विशेषत: तरुण आणि विद्यार्थ्यांशी सातत्याने, विनाअडथळा संवाद साधण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत दिलीप पाडगावकर यांच्या निधनाने एक सव्यसाची व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पाडगावकर यांची पत्रकारितेतील अर्धशतकी कारकीर्द ही अतिशय समतोल आणि पत्रकारितेचा वस्तूपाठ आहे. विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा त्यांचा चांगला अभ्यास होता. भारतीय पत्रकारितेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मानवता या विषयात पीएच.डी. करणाऱ्या पाडगावकर यांच्या जगण्याचा आणि लिखाणाचा केंद्रबिंदूही मानवतावाद हाच होता. याशिवाय काश्मिरमधील परिस्थिती सुधारण्याविषयी उपाययोजना सुचविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी पत्रकार, विचारवंत आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले आहे, असे त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior journalist dileep padgaonkar 72 passes away
First published on: 25-11-2016 at 12:56 IST