“आमची शेवटची निवडणूक आहे सांगत मते मागितली जातील. तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे”, असं अजित पवार काल (४ मार्च) म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याच्या सर्वच क्षेत्रातून समाचार घेतला गेला. यावरून अजित पवारांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

“उद्या जेव्हा खासदारकीच्या निवडणुका येतील. मी उमेदवार जाहीर करेन, तिथे मी उभा आहे (अजित पवार) असं समजून मतं द्या हे मी तुम्हाला सांगतो. कुणी भावनिक होतील. आमची शेवटची निवडणूक आहे म्हणतील. अमकंच आहे, तमकंच आहे म्हणतील. त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही. पण, तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे शरद पवार गटातील नेत्यांनी याविरोधात टीका केली. एखाद्या माणसाच्या मृत्यूची वाट पाहणं कितपत योग्य आहे, अजित पवारांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. तसंच, अनेक नेत्यांनीही अजित पवारांवर टीकास्र डागलं. यावरून अजित पवारांनी त्यांची भूमिका एक्सवरून स्पष्ट केली.

हेही वाचा >> “आमची शेवटची निवडणूक आहे समजून…”, अजित पवारांकडून बारामतीकरांना विनंती

अजित पवार म्हणाले, “काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांनी यापूर्वीही शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर झालेल्या पहिल्याच सभेत त्यांनी शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त व्हावं अशी अपेक्षा केली होती. तेव्हाही प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यामुळे कालच्या बारामतीतील भाषणावरूनही शरद पवार गटातील नेत्यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.