कोल्हापूर : ‘उत्कृष्टतेचा मार्ग सोपा नसतो. त्यासाठी जिद्द लागते, सचोटी लागते आणि महत्त्वाकांक्षा लागते,’ असा संदेश ज्येष्ठ शास्त्रज्ञ, लेखक डॉ. जयंत नारळीकर यांनी आपली जन्मभूमी कोल्हापुरात एका कार्यक्रमात बोलताना दिला. याच विचारधारेचे आचरण करत त्यांनी खगोलशास्त्रात गगनाला गवसणी घालण्याची अद्वितीय कामगिरी केली. त्यामुळेच जगातील प्रमुख वैज्ञानिकांमध्ये त्यांची गणना होत राहिली, तरीही त्यांनी कोल्हापूरशी असलेला ऋणानुबंध कधीच कमी होऊ दिला नाही.
डॉ. जयंत नारळीकर यांचे आज पुण्यामध्ये निधन झाले. ते मूळचे कोल्हापूरचे. याच शहरात त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजीचा. त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री नारळीकर हे संस्कृतपंडित व प्रवचनकार होते. त्यांचे वडील रँग्लर विष्णू नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ. वडील आणि त्यांचे तीन भाऊ कोल्हापुरात राहत असत.
कोल्हापूरविषयी आपुलकी
कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूल, राजाराम महाविद्यालयात जयंत नारळीकरांचे शिक्षण झाले. याच काळात त्यांच्या मनात गणित व विज्ञान विषयाची गोडी उत्पन्न झाली. तीच त्यांना पुढे नावारूपाला आणण्यास कारणीभूत ठरली. पुढे शिक्षणासाठी ते वाराणसी येथे गेले. त्यानंतरच्या काळात त्यांनी विज्ञान, संशोधन, साहित्यिक क्षेत्रात लौकिक मिळवला; पण, आकाशाशी नाते जडले असतानाही त्यांनी कोल्हापुरातील घर, शिक्षण, नातेवाईक यांच्याशी असलेली आपुलकी, सुटी, वेळोवेळीच्या भेटी, विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने कोल्हापूरशी आलेला संबंध अखेरपर्यंत मनापासून जोपासला. त्याचा उल्लेख त्यांनी आत्मचरित्रामध्ये आवर्जून केला आहे. कोल्हापूरच्या आठवणीने ते भावनिक होत असत.
कोल्हापुरात आदर, सन्मान
कोल्हापूरकरांनीही त्यांच्या कार्याची उचित दखल घेऊन गौरव करण्यात कसूर ठेवली नाही. राजर्षी शाहू पुरस्कार, करवीरभूषण, कोल्हापूरभूषण असे मानाचे पुरस्कार त्यांना प्रदान करून त्यांच्या विषयीचा आदर जाहीरपणे व्यक्त केला. ‘जननी जन्मभूमी ही आईपेक्षा मोठी असते. त्यामुळे कोल्हापूरकडून मिळणारा सन्मान मला विशेष वाटतो,’ अशा शब्दांत त्यांनी जन्मभूमी कोल्हापूरविषयीचा आदर बोलून दाखवला होता.
चिंतनशील मांडणी
शिवाजी विद्यापीठाच्या ५१ व्या दीक्षान्त समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. नारळीकर यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील यांना डी. लिट. उपाधि प्रदान करण्यात आली होती. त्यावे ळी डॉ. नारळीकर यांनी शिक्षण क्षेत्राविषयी चिंतन केले होते.
‘विद्वान सर्वत्र पूज्यते’
असे म्हटले जात असले, तरी आज आपल्या देशात तशी परिस्थिती नाही हे कोणीही कबूल करेल. विद्येच्या अलंकारापेक्षा पैसा, अधिकार मोठे मानले जातात. ‘असे का व्हावे?’ असे म्हणत त्यांनी परिस्थितीविषयी खंत व्यक्त केली होती. ‘विद्येसाठी सतत झटणे, विद्यादान करण्यात आनंद मानणे, उत्कृष्टतेची कदर करणे आणि धन-सन्मानांबद्दल नि:स्पृह राहणे हे गुण आजच्या किती विद्वानांत सापडतात? राजकारणापासून भारतातले कोणतेही विद्यापीठ मुक्त नाही, ही वस्तुस्थिती आहे. विद्यापीठाचे क्षेत्र ओलांडून विविध राष्ट्रीय संशोधन संस्थांकडे पाहिले, तर तिथे शासकीय क्षेत्रातील अधिकारशाही दिसते,’ हे त्यांचे विधान त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देणारे ठरले.
नव्या पिढीशी संवाद
कोल्हापुरातील अनेक समारंभांना डॉ. नारळीकर यांची उपस्थिती असायची. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते तत्पर असायचे. मुला-मुलींनी आपल्यासमोर केवळ सही घेण्यासाठी गर्दी करणे नारळीकर यांना मान्य नव्हते. तुम्ही मला विज्ञान विषयातील शंका विचारा. त्याचे निरसन मी तुम्हाला पत्र पाठवून करेल आणि खाली माझी सही असेल, असे नारळीकर विद्यार्थ्यांना समजावत असत, अशी आठवण उदय कुलकर्णी यांनी सांगितली.