सातारामधील कराड तालुक्यातील तांबवे गावानजीक असलेल्या कोयना नदीतील पुलाखाली ग्रेनेड बॉम्ब सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी मासेमारी करणाऱ्या काही युवकांच्या जाळ्यात हे बॉम्ब सापडले. घटनेची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकसह मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आहे.
कराडपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर तांबवे गावानजीक कोयना नदीवर पूल आहे. या पुलानजीक सोमवारी दुपारी काही युवक मासेमारी करीत होते. त्यावेळी त्या युवकांनी टाकलेल्या जाळ्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. युवकांनी तातडीने याबाबतची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. पथकाने प्राथमिक पाहणी केली असता ते ग्रेनेड बॉम्ब असल्याचे दिसून आले. त्यामुळे याबाबतची माहिती दहशतवादविरोधी पथकाला देण्यात आली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाकडून ग्रेनड बॉम्बची तपासणी सुरू असून ते नदीपात्रात कोणी व कशासाठी टाकले याचा शोध घेतला जात आहे.

मासेमारी करणाऱ्या युवकांनी गळ नदी पात्रातून पाण्याबाहेर काढला. त्यावेळी जाळ्यात बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, शिवाय ते वजनाला जड असल्याने त्यांना याबाबत अधिकच शंका आली. त्यानंतर या युवकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करण्याचे काम सुरू केले. दरम्यान सापडलेले ग्रेनेड सैन्य दलाचे असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्याबाबत माहिती घेण्याचे कामही सुरू आहे. या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensational grenade bomb found under bridge in koyna river near karad msr
First published on: 17-05-2021 at 18:25 IST