मराठी भाषेत बोलल्याबद्दल मुलीच्या पित्याला ८० हजार रुपये दंड ठोठावणाऱ्या जातपंचायती विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलीच्या सासू, सासरा व नवऱ्याविरुद्ध छळवणूक करून गर्भपातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सातजणांना अटक केल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली.
सांगलीतील गोसावी समाजाच्या जातपंचायतीच्या या अन्यायाचे वृत्त दै. ‘लोकसत्ता’ने ८ ऑगस्ट २०१३ रोजी प्रसिद्ध केले होते. यावर पोलिसांनी या प्रकरणाची स्वतंत्र्यरीत्या चौकशी करून गुरुवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले.
या घटनेची पाश्र्वभूमी अशी बेडग (जि. सांगली) येथील देविका ऊर्फ पल्लवी हिचे मिरजेतील चेतन मधुकर मुळेकर (गोसावी) याच्याशी १ जून २००९ रोजी लग्न झाले. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला होता.
या दरम्यान मुलीचे वडील शिवाजी जाधव ४ मार्च २०११ रोजी मुलीच्या नणंदेच्या डोहाळे कार्यक्रमासाठी मुलीच्या सासरी आले असता या वेळी उपस्थित समाजातील लोकांना त्यांनी ‘नमस्कार’ म्हणून अभिवादन केले. यावरून समाजातील लोकांनी,‘तू कायम मराठीतून बोलतोस,’ म्हणून आरोप केले. समाजाच्या पंचांनी याप्रकरणी त्यांना ८० हजार रुपये दंडही ठोठावला.
जाधव यांनी दंडाची रक्कम न दिल्यावर जातपंचायतीने आणि संबंधित मुलीच्या सासरच्या मंडळींनी मुलीस नांदवण्यास नकार दिला. यानंतर या बापलेकीला समाजबहिष्कृतही करण्यात आले. या साऱ्या प्रकाराबद्दल मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रारही दिली. या तक्रारीनंतर सासरी असलेल्या मुलीला ती गर्भवती असताना सासरच्या लोकांनी लाथांनी मारहाण केली.
यामध्ये तिचा गर्भपात झाला. यानंतर तिची रवानगी थेट माहेरी म्हणजेच बेडगला करण्यात आली. यानंतर संबंधित विवाहितेच्या पती चेतन मुळेकर (गोसावी) याला जातपंचायतीने परस्पर सोडपत्रही दिले. हे सोडपत्र घेताना अन्य व्यक्तीलाच मुलीचे वडील म्हणून समाजाच्या बठकीपुढे उभे करण्यात आले. या सर्व प्रकरणी पती चेतन, सासू शोभा आणि सासरा मधुकर श्रीपती गोसावी या तिघांविरुद्ध शिवीगाळ, मारहाण आणि जाच केल्याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
तर समाजाचे पंच आकाराम गोसावी, रमेश गोसावी, दिनेश तिडके, शहाजी गोसावी, विलास गोसावी, नामदेव गोसावी, गजानन गोसावी, दशरथ गोसावी (सर्व रा. कृष्णाघाट रोड, मिरज) आणि श्रीमंत खागल गोसावी (रा. गोवा) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी नवरा, सासू, सासरा यांच्यासह आकाराम गोसावी, रमेश गोसावी, दिनेश गोसावी आणि शहाजी गोसावी अशा सात जणांना अटक केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2013 रोजी प्रकाशित
मराठीत बोलल्याबद्दल विवाहितेस नांदवण्यास नकार
मराठी भाषेत बोलल्याबद्दल मुलीच्या पित्याला ८० हजार रुपये दंड ठोठावणाऱ्या जातपंचायती विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
First published on: 24-08-2013 at 03:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven arrested for imposing fine to marathi speaker