scorecardresearch

सात महिने शिक्षणकार्य अव्याहत; सातारा येथील शिक्षक बालाजी जाधव यांचे विशेष प्रयत्न

२०१७ मध्ये शाळेत नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी देणग्यांच्या माध्यमातून एलसीडी प्रोजेक्टरसारखी इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध केली.

|| अलिफिया खान, एक्स्प्रेस वृत्त

सातारा येथील शिक्षक बालाजी जाधव यांचे विशेष प्रयत्न

करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील शाळा पुन्हा सुरू होण्यात अनेक अडचणी येत असताना साताऱ्यातील विजयनगरच्या जिल्हा परिषद शाळेत गेल्या सात महिन्यांपासून शिक्षणकार्य अव्याहतपणे सुरू आहे. या एकशिक्षकी शाळेतील शिक्षक बालाजी जाधव यांनी झाडाखाली, व्हरांड्यात, शाळेच्या आवारात असे शक्य त्या सर्व ठिकाणी ३८ विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले असून, क्रमिक शिक्षणाला कौशल्य विकासाचीही जोड दिली आहे. 

 विजयनगरच्या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. शाळेतील विद्यार्थी प्रामुख्याने गरीब कुटुंबातील असल्याने ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाऊ शकतात याचा विचार करून शिक्षक बालाजी जाधव यांनी प्रत्यक्ष शिकवण्याला प्राधान्य दिले. राज्यातील शाळा अधिकृतरीत्या १ डिसेंबरला सुरू झालेल्या असल्या तरी जाधव यांनी त्याआधीच वर्ग सुरू केले. बालाजी जाधव हे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त आहेत. त्यांनी प्रशासनाच्या आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे, विजयनगरची शाळा सुरू झाल्याचे कळल्यानंतर जवळपासच्या गावातील काही विद्यार्थ्यांनीही या शाळेत प्रवेश घेतला. त्यातील अकरा विद्यार्थी खासगी शाळांतून या शाळेत आले आहेत.

जाधव यांची २०१७ मध्ये शाळेत नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी देणग्यांच्या माध्यमातून एलसीडी प्रोजेक्टरसारखी इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध केली. निधीअभावी वीजदेयक भरण्यात अडचणी असल्याने त्यांनी शेजाऱ्यांना विनंती करून स्वत:च्या खिशातून पैसे देऊन वीज जोडणी घेतली आहे. शाळा सुरू करण्याबाब जाधव म्हणाले, की मार्च २०२०मध्ये शाळा बंद झाल्यावर पहिल्या टाळेबंदीच्या काळात करोना विषाणूबाबत  काहीच माहीत नव्हते. एक करोनाबाधित आढळल्यानंतर लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कॉन्फरन्स कॉलसारख्या माध्यमांचा वापर केला. ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थी एकाग्रतेने शिकत नसल्याचे पालकांचे म्हणणे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यास, एक-दोन विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना शिकवणे सुरू केले. त्यासाठी प्रशासनाकडून तोंडी आदेश आणि पालकांची लेखी परवानगी घेतली, असे जाधव यांनी सांगितले.

बहुकौशल्य विकसित…

नियमित वर्गांसह विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी जाधव यांनी बहुकौशल्य विकसन कार्यक्रम सुरू केला आहे. केवळ दोन खोल्यांच्या शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी कल्पक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात विद्यार्थ्यांना टॅब्लेटवर पियानोवादन, साबण तयार करणे, तिरंदाजी, वारली चित्रकला, घड्याळ निर्मिती असे उपक्रम केले जातात. त्यामुळे सात-आठ वर्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती होण्यास मदत झाली आहे, असे जाधव यांनी सांगितले.

अधिकृतरीत्या शाळा सुरू करता येत नसतानाच्या काळात करोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या किंवा रुग्ण नसलेल्या भागात प्रशासनाने अनौपचारिकरीत्या वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे मैदानात, झाडाखाली विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहिले. – विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Seven months continuous teaching special efforts of balaji jadhav teacher from satara akp

ताज्या बातम्या