सोलापूर : निराधार, उपेक्षित मुलींसाठी आश्रमशाळा चालविणाऱ्या संस्थेत अधीक्षकपदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एका मागासवर्गीय उच्चविद्याविभूषित महिलेवर लैंगिक अत्याचार केला आणि तिच्याशी जातीवाचक शब्द वापरून अवमान केल्याप्रकरणी संस्थाचालकासह तेथील दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे या प्रकरणातील पीडित महिलेविरुध्द सुध्दा एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

सोलापूर-बार्शी रस्त्यावर कारंबा परिसरात स्थित असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत आई-वडिलांना पारखे झालेल्या तसेच अन्य उपेक्षित मुलींसाठी आश्रमशाळा चालविली जाते. एका प्रसिद्ध सराफामार्फत कार्यरत असलेल्या या संस्थेच्या आश्रमशाळेत अधीक्षकपदावर नोकरी लावतो, असे आमिष दाखवून मुंबईतील एका ४७ वर्षांच्या मागासवर्गीय उच्चविद्याविभूषित महिलेला संस्थाचालकाने बोलावून घेतले. तिला काही दिवस तिच्या मुलीसह आश्रमशाळेतील खोलीत ठेवले. मात्र पीडित महिलेला नेमणूकपत्र न देता, तिच्यावर अत्याचार केले. याकामी संस्थेतील अन्य दोन महिलांनी मदत केल्याचे पीडित महिलेने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संस्था चालकासह दोन महिलांविरुद्ध लैंगिक अत्याचारासह ॲट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, या उलट संस्थाचालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार यातील पीडित महिलेला संस्थेच्या नोकरीतून कमी करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोकरीवर पुन्हा घ्या, अन्यथा तुमच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल करीन, अशी धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी पीडित महिलेने मागितल्याचा आरोप संस्थाचालकाने दिलेल्या फिर्यादीद्वारे केला आहे. त्यानुसार पीडित महिलेविरुद्ध देखील खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्याद नोंद असून यात सखोल तपास केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.