२००६ नंतर प्रथमच शहाद्याजवळून वाहणाऱ्या गोमई नदीला महापूर आल्याने तालुक्यातील अनेक गावांचा शहाद्याशी असलेला संपर्क तुटला आहे. सुमारे १९ तास मुसळधार पाऊस झाल्याने शहाद्यातील जनजीवनही पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सखल भागात ठिकठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून प्रशासनाच्या वतीने मदतकार्य सुरू करण्यात आले असले तरी पावसामुळे त्यात अडथळे निर्माण होत आहेत. गोमई नदी तापीला जाऊन मिळत असल्याने तापीलाही पूर आला असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहादा व परिसरात शनिवारी सायंकाळी सात वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार वृष्टी होऊ लागल्याने काही वेळातच शहरातील रस्त्यांवर पाणी साचले. पाऊस रात्रभर सुरू राहिल्याने शहाद्याजवळून जाणाऱ्या गोमई नदीला कित्येक वर्षांनंतर महापूर आला. या महापुरामुळे शहादा ते पिंगाणे, पाडळदे या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली.
शहादा-धडगाव रस्त्यावरीलही अनेक छोटे पूल पाण्याखाली गेल्याने तोरणमाळकडे जाणारी वाहतूकही बंद झाली. शहादा-दोंडाईचा मार्गावरील एका नाल्याला आलेल्या पुरामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली. जयनगर येथे प्रवाशांना उतरवून बस पूर आलेल्या नाल्यातून पलीकडे नेण्याचा चालकाचा प्रयत्न फसला व बस नाल्यात उलटी झाली. हा पाऊस रविवारी दुपारी दोनपर्यंत म्हणजेच सुमारे १९ तास सुरू राहिल्याने शहरात जलमय झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
मेनरोडला जणूकाही नदीचे स्वरूप आले होते. ठिकठिकाणी वाहने अडकून पडली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. दुपारी दोननंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. यादरम्यान शहरातील वीजपुरवठाही खंडित झाल्याने रहिवाशांच्या गैरसोयीत अधिकच भर पडली. वडाळी येथे घराची भिंत कोसळून एक जण जखमी झाला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2013 रोजी प्रकाशित
शहादा परिसरात १९ तास मुसळधार; गोमईला महापूर, तापीला पूर
२००६ नंतर प्रथमच शहाद्याजवळून वाहणाऱ्या गोमई नदीला महापूर आल्याने तालुक्यातील अनेक गावांचा शहाद्याशी

First published on: 23-09-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahada faces 19 hour long heavy rain gomai tapi gets flooded