पंढरपूर : गुवाहाटीला संजय राऊत यांनाही यायचे होते. पण ३० ते ३५ आमदारांनी विरोध केला. असा गौप्यस्फोट माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला. त्यामुळे तो राग मनात धरून शिंदे यांच्यावर राऊत नेहमी टीका करत आहे. दोन बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. तसेच लवकरच मोठा धमाका होईल असा सूचक इशारा त्यांनी दिला.
माजी आमदार शहाजीबापू पाटील हे पंढरपूरमध्ये आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी गुवाहाटी बंडला ३ वर्षे होत आहेत, काय अनुभव आहे, असे विचारले असता पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. गुवाहटीच्या बंडामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून संजय राऊत यांनाही यायचे होते. पण त्यावेळी ३० ते ३५ आमदारांनी राऊत यांना विरोध केला. ते जर पुन्हा आपल्याकडे आले तर आपल्याला त्रास देतील. त्यांना घेऊ नका, असे शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्याचे पाटील यांनी सांगितले. तो राग मनात धरून राऊत नेहमी शिंदे यांच्यावर टीका करतात. राऊत यांनी केलेले खोटे आरोप मतदारांनी झुगारून दिले. त्याचा प्रत्येय विधानसभा निवडणुकीत दिसून आला आहे. जनतेने शिंदे यांना भरघोस मतदान केल्याचे पाटील म्हणाले.
राज आणि उद्धव हे दोन भाऊ एकत्र येणार का? असे विचारल्यावर पाटील यांनी, राज ठाकरे हे कडवट हिंदू विचारसरणीचे आहे. मराठी प्रश्नावर नेहमी आक्रमक झालेले आपण पाहिले. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या नादी लागून काँग्रेस सोबत गेले. काँग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यामुळे राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी वाटते आणि जर आले तर त्यांच्यावरचा विश्वास देखील जनतेचा उडेल, असे पाटील यांनी मत व्यक्त केले. येत्या काळात उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदारांना शिंदेचे नेतृत्व मान्य आहे. काही तांत्रिक, कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे येत्या काळात मोठी राजकीय उलथापालथ होईल. असा दावा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.