मराठा आरक्षणाचं आंदोलन आता तीव्र होऊ लागलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. ही जाळपोळ मराठा समाजाकडून होत नसून यामागे दुसरेच कुणीतरी असल्याची शंका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यातलं मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळल्यानंतर जालन्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सरकारच्या या कारवाईवरून मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

इंटरनेट बंदीवर मनोज जरांगे म्हणाले, शिंदे सरकारला याशिवाय दुसरं काही काम आहे का? सरकारकडून इंटरनेट बंद करून आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, तुम्ही जातीविरोधात मैदानात उतरलात तरी हे मराठ्यांचं आंदोलन आहे लक्षात ठेवा. हे आंदोलन आता थांबणार नाही. आम्ही तुम्हाला भाऊ म्हणतो. पण हा भाऊ सारखा दांडकं घेऊन आमच्याकडे येणार असेल तर आम्हालासुद्धा आमच्या मर्यादा सोडाव्या लागतील. मग त्याला हे सरकार जबाबदार असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) याला जबाबदार असतील. त्यातला एक उपमुख्यमंत्री जास्त जबाबदार असेल. कारण, त्यालाच अशा काड्या करायची लई सवय आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर राज्य सरकारमधील काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना राजकीय वक्तव्य न करता आंदोलनावर बोलण्याचा सल्ला दिला आहे. यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा >> “…ते आमदार मराठ्यांचे दोषी मानले जातील”, अजित पवार गटातील आमदाराचं वक्तव्य

शहाजीबापू पाटील म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे राजकीय व्यक्तिमत्व नाही. ते तळमळीने हे सगळं करत आहेत. परंतु, चुकून त्यांच्या तोंडून एखादं वाक्य गेलं असेल. मला त्याची काही माहिती नाही. त्यांच्या तोंडून चुकून काहीतरी गेलं असेल. मनोज जरांगे हा साधा-भोळा माणूस आहे. तसेच मराठा आरक्षणावर शहाजीबापू पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणावर तोडगा काढतील, असा माझा ठाम विश्वास आहे.