देशात विश्वासघातकी राजकारणाला शरद पवार यांनीच सुरुवात केली. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले चाललेले सरकार पाडणाऱ्या शरद पवार यांना आज पाठीत खंजीर खुपसणे काय असते, हे चांगले कळले असेल असं वक्तव्य माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी रात्रीपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथे डॉ. शालिनीताई पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौकशांमधून सुटण्यासाठीच काकाच्या पाठीत पुतण्याने खंजीर खुपसला असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. ‘आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला चिरशांती लाभली आहे. आजवर विश्वासघातकी राजकारण करणे हेच पवारांना नडले असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीला शरद पवार हेच जबाबदार आहेत,” असा थेट यावेळी त्यांनी केला.

“अजित पवार यांनी शरद पवार यांचाच आदर्श घेतला आहे. आजवर ज्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसले, त्यावेळी ५० वर्षांपूर्वी त्यांना जो काही त्रास झाला असेल, तो स्वत:ला कसा होतो, हे शरद पवार यांना अनुभवायला मिळाला आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

“नियतीचा नियम असून, जे पाप करायचे ते येथेच फेडायचे. शरद पवार यांना या वयात पाप फेडावे लागले आहे”, असेही शालिनीताई यांनी सांगितलं. “पवार कुटुंबीय हे सत्तेवाचून राहू शकत नाही, असा आरोप मी दोनच दिवसांपूर्वी केला होता. त्याचा प्रत्यय शुक्रवारी रात्रीपासून महाराष्ट्राला आला आहे. अजित पवार यांना आपली दुष्यकृत्ये लपवायची असल्याने आणि अनेक प्रकरणांच्या चौकशांच्या ससेमिऱ्यातून सुटण्यासाठी त्यांनी स्वत:च्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसला हे वास्तव आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

“राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणामध्ये अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे या वरचढ ठरत होत्या. प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचा हस्तक्षेप होत असल्याने आणि वडिलांना पुतण्यापेक्षा मुलगी कधीही जवळची असल्याने नैराश्येतून अजित पवार यांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला,” असा आरोपही शालिनीताई पाटील यांनी केला आहे.

अजित पवार परदेशात पलायन करणार
‘अजित पवार यांचे राजकारणातील स्थान आता डळमळीत होऊ लागल्याने ते काही कालावधीत परदेशात पलायन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यापुढे काय-काय वाढून ठेवले आहे, हे माहीत नाही. मात्र, ते जर परदेशात निघून गेले तर मला माझ्या कारखान्याच्या विषयावर आणखी लढा द्यावा लागेल,” असेही शालिनीताई पाटील यांनी सांगितले.

जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात ईडीकडे तक्रार-
“जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात गेल्या १६ ऑक्टोबरला मी स्वत: ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. हा कारखाना परत मिळवून पुन्हा सभासदांच्या ताब्यात द्यायचा असून, त्यासाठीचा माझ्या आयुष्यातील हा शेवटचा संघर्ष आहे. शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आणल्याचा आणि अजित पवार यांनी सत्तेच्या जोरावर राज्य बँक ताब्यात घेऊन साखर कारखाने बळकवले आहेत,” असा आरोप डॉ शालिनीताई पाटील यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shalinitai patil ncp sharad pawar ajit pawar vasantdada patil maharashtra political crisis sgy
First published on: 25-11-2019 at 08:11 IST