शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपावरून शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचे नेते नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ आल्यास खात्यांमध्ये अदलाबदल करण्याचीही तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी (१६ ऑगस्ट) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

शंभुराजे देसाई म्हणाले, “खातेवाटपात बदल करण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून कुठलं खातं कुणाला द्यायचं हा त्यांचा अधिकार असल्याचं म्हटलंय. याशिवाय दिलेल्या खात्यात बदल करायचा अधिकारदेखील त्या दोघांचा असल्याने त्यावर आम्ही मंत्र्यांनी बोलणं योग्य नाही.”

“आमच्यापैकी कुणीही असं मत व्यक्त केलं नाही”

“आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कुणी मिळालेल्या खात्याबाबत नाराज आहोत असं व्यक्त झालं आहे का? आमच्यापैकी कुणीही असं व्यक्त झालेलं नाही, मत प्रदर्शित केलेलं नाही. मात्र, जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवल्या जात आहेत. असं का होतंय हे आम्हालाही समजत नाही. आम्ही पहिल्या टप्प्यात शपथ घेतलेले शिवसेनेचे नऊ मंत्री आहोत. या मंत्र्यांकडे कोणते विभाग द्यायचे हा पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार आहेत,” असं मत शंभुराजे देसाई यांनी व्यक्त केलं.

“कुणीतरी अशा वावड्या उठवत आहे”

देसाई पुढे म्हणाले, “आम्ही शिवसेनेचे ४० आमदार आणि ११ अपक्ष आमदार सर्वांनी पहिल्याच दिवशी आम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचं का नाही, घेतल्यावर कोणतं खातं द्यायचं या सर्व बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे आमचे कुणीही मंत्री असं बोलत नाहीत. ते स्वतः बोलत नसताना कुणीतरी अशा वावड्या उठवत आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जी खाती दिलीत त्याचं काम त्यांना अभिप्रेत आहे असं करणं यावरच आमचा भर आहे. आम्ही कुणीही नाराज नाही.”

हेही वाचा : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेनेच्या चिन्हाबाबतच्या एकनाथ शिंदे गटाविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णांकडून महत्त्वाचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्यात कोणतीही नाराजी नाही”

“स्वतः खातं मिळालेले मंत्रीच त्याबाबत नाराजी व्यक्त करत नाहीत, तर केवळ चर्चा आहे आणि कुणीतरी म्हणतंय म्हणून असं बोलणं योग्य नाही. आमच्यात अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नाही,” असंही देसाई यांनी नमूद केलं.