अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिवसेनेचा शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच शिंदे गटातील काही आमदार ठाकरे गटाकडे परत जातील असे दावेही केले जात आहेत. या चर्चेवर शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच देसाई यांनी या सगळ्या खोट्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. शंभूराज देसाई म्हणाले काहीजण या अशा अफवा पसरवत आहेत. परंतु आमचं विकासाचं ट्रिपल इंजिन सरकार अधिक मजबूत झालं आहे.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ती मंडळी (महाविकास आघाडी) वज्रमूठ दाखवत होते. परंतु ती वज्रमूठ आता सैली झाली आहे. ते लोक जो चेहरा दाखवत होते, जो चेहरा त्यांच्याकडे केंद्रस्थानी होता, राज्यातल्या जनतेला हवाहवासा वाटणारा तो लोकप्रिय चेहरा (अजित पवार) आज महायुतीत आला आहे. आम्ही ५० लोकांनी (आमदार) ते समजून घेतलं आहे. शंभूराज देसाई यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. तेव्हा त्यांनी सगळ्या राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली.

यावेळी देसाई यांना शिंदे गटातील नाराजीबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, मोठ्या मनाने एकनाथ शिंदे साहेबांनी अजित पवार यांचं सरकारमध्ये स्वागत केलं आहे. कॅबिनेटची जी पहिली बैठक झाली. त्या बैठकीच्या सुरुवातीला. आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आमच्यात कसलीही नाराजी नाही. उलट आता आमचं डबल इंजिन सरकार विकासाची बुलेट ट्रेन झालं आहे.

हे ही वाचा >> “अजित पवार आमचे नवे साथी, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, म्हणाले, “त्यांच्या येण्याने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शंभूराज देसाई म्हणाले, अजित पवार हा खूप महत्त्वाचा चेहरा वाटतो. त्यामुळे ते सत्तेत सहभागी झाल्याने सरकार मजबूत झालं आहे. यावर त्यांना विचारण्यात आलं की, तुम्हाला शरद पवार महत्त्वाचा चेहरा वाटत नाहीत का? यावर मंत्री देसाई म्हणाले, पवार साहेब महत्त्वाचा चेहरा आहेत, परंतु तिकडचे सगळे चेहरे इकडे आले तर तिकडे सगळं रिकामं होईल. खरंतर, चालणारं नाणं बघितलं पाहिजे, अजित पवार हे असं व्यक्तिमत्व आहे जे सगळ्यांना सामावून घेऊन जातात. त्यांची काम करण्याची, मैत्री जपण्याची पद्धत आम्ही बघितली आहे.