अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजपाच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकप्रकारे सूचक इशाराच दिला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि त्यातही अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात सातत्याने अन्याय होत असल्याची ओरड करत थेट बंडाचा झेंडा उगारणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांची नव्या घडामोडींमुळे कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अजित पवारांच्या सरकारमधील सहभागामुळे शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

अजित पवार महायुतीत सहभागी झाल्याने शिंदे गट बॅकफूटवर गेला असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा कालपासून (२ जुलै) सुरू आहेत. एकनाथ शिंदेंबरोबर एकूण ४० आमदार असून सत्तेत त्यांना १० मंत्रीपदं मिळाली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपद मिळेल या आशेवर होते. अशातच रविवारी अजित पवारांनी महायुतीत प्रवेश केला, तसेच त्यांच्यासह एकूण नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. परिणामी शिंदे गटातील आमदार अजूनही ताटकळत आहेत. त्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. यावर शिंदे गटातील प्रमुख नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा >> राष्ट्रवादीत किती आमदार उरले? जयंत पाटलांनी सांगितली नेमकी आकडेवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांच्या येण्याने शिंदे गट खूश आहे का असा प्रश्न विचारल्यावर शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही खूश आहोत. आमचे आमदार १०० टक्के खूश आहेत. बघा आमचे चेहरे. आमच्यात (शिंदे गट – अजित पवार) मतभेद होते. काही प्रकरणांमध्ये त्यांचं मत वेगळं होतं, आमचं मत वेगळं होतं. त्यांचे आणि आमचे विचार वेगळे होते. परंतु आता ते आमच्याबरोबर आले आहेत. महायुतीत आले आहेत. आता त्यांचं पूर्वीचं धोरण बदलेल. तसंच आमचंही धोरण बदलेल. नवीन धोरणाप्रमाणे आणि सुत्राप्रमाणे आम्ही पुढे जाऊ.