अहिल्यानगर : शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानाच्या ‘ॲप’ गैरव्यवहार प्रकरणी चौकशीत, देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर १ कोटीहून अधिक रक्कम आढळली. ही रक्कम परवानगी दिलेल्या व परवानगी न दिलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या ‘ॲप’च्या माध्यमातून त्यांना मिळाल्याचे तपासात आढळले. या दोन कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम पुढे कोणाकोणाकडे गेली, त्याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
शनैश्वर देवस्थानच्या ‘ॲप’ गैरव्यवहारप्रकरणी सायबर क्राइम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास सध्या सुरू आहे. या तपासाविषयी पोलीस अधीक्षक घार्गे यांनी माहिती दिली. या वेळी अतिरिक्त अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी आदी उपस्थित होते.
घार्गे म्हणाले, की शनैश्वर देवस्थानाच्या या गैरव्यवहारामध्ये अधिकृत ‘ॲप’शिवाय अन्य ‘ॲप’द्वारे तेल, अभिषेक दर्शन यासाठी ५०० ते ५ हजारांपर्यंत रकमा घेतल्या गेल्या. रक्कम छोटी असल्याने कोणी भाविक फिर्याद देण्यास पुढे आले नाही. परंतु हजारो भाविकांकडून या रकमा जमा झाल्याने एकूण रक्कम मोठी आहे. त्यामुळे पोलीस स्वतःहून फिर्यादी झाले, असे त्यांनी स्पष्ट केले. देवस्थानाकडून ३ ‘ॲप’ला परवानगी होती.
मात्र, परवानगी न दिलेले आणखी ४ ‘ॲप’ प्रत्यक्षात वापरात असल्याचे समोर आले आहे. या ७ ‘ॲप’ व्यतिरिक्त आणखीही ॲप असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कारण केवळ शनैश्वर देवस्थानच नाही, तर देशभरातील अन्यही देवस्थान या ‘ॲप’ला जोडले गेले आहेत. ‘ॲप’ तयार करणारे व चालवणारे बाहेरचे आहेत. या ‘ॲप’च्या माध्यमातून भक्तांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थानाच्या व्यक्तींकडून मदत झाली आहे का किंवा देवस्थान व ‘ॲप’ यांच्यात अटी व करार झाला आहे का, हे तपासात समोर आलेले नाही. तसेच, ज्या ‘ॲप’ला परवानगी होती, त्या माध्यमातून देवस्थानला किती पैसे मिळाले हे अद्याप समोर आलेले नाही.
काही ‘ॲप’ प्रतिष्ठित कंपन्यांचे आहेत. त्यांच्याकडून फक्त शनैश्वर देवस्थान नाही, तर अयोध्या, वैष्णोदेवी अशा विविध ठिकाणी सुविधा दिल्या जातात. त्यांचा देवस्थानशी कशा पद्धतीने करार आहे हे आम्ही शोधत आहोत. वेगवेगळ्या देवस्थानांबरोबर पत्रव्यवहार करून माहिती घेणार आहोत, असे अधीक्षक घार्गे यांनी म्हटले आहे.
शनैश्वर देवस्थानच्या ‘ॲप’ गैरव्यवहाराबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे अजून बाकी आहेत. बराचसा तपास तांत्रिक स्वरूपाचा आहे, त्यांची उत्तरे मिळावीत या दृष्टीने तपास केला जात असल्याने अद्याप कोणालाही आरोपी केलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘सीईओ’ची दोनदा चौकशी
देवस्थानाचे विश्वस्त किंवा अधिकारी यांपैकी केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशीसाठी दोनदा बोलावले होते. त्यांना ‘ॲप’च्या माध्यमातून देवस्थानला काय फायदा झाला किंवा किती रक्कम देवस्थानाला मिळाली ही माहिती मागितली. मात्र, ही माहिती अद्याप त्यांनी दिलेली नाही. आत्महत्या केलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांना चौकशीसाठी बोलावलेले नव्हते, असेही पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.
सायबर शाखेत तज्ज्ञांची नियुक्ती
या ‘ॲप’ गैरव्यवहारासह अन्य अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर शाखेत तज्ज्ञ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. आतापर्यंत १०३ अर्ज आले आहेत. संगणक तज्ज्ञ, अभ्यासक्रम केलेले असे कर्मचारी अपेक्षित आहेत. आतापर्यंत सात ते आठ कर्मचारी निवडले असून, १० जणांचे पथक तयार केले जाणार असल्याचे अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले.
‘एलसीबी’साठी लोकप्रतिनिधींच्या शिफारशी
स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) जुन्या व नव्याचा मेळ घालून नियुक्त्या केल्या जातील. शाखा सक्षम झाल्यानंतर विशेष पथक बंद केले जाईल. यापूर्वी ज्यांनी या शाखेत काम केले, त्यांना पुन्हा संधी नसेल, असे स्पष्ट करून अधीक्षक घार्गे म्हणाले, की एलसीबीतील नेमणुकीसाठी लोकप्रतिनिधींच्याही शिफारशी आल्या आहेत. मात्र, त्यांनी दिलेल्या व्यक्तीची तपासणी करूनच नियुक्ती दिली जाणार आहे.